कोर्लई | राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळातर्फे साळाव-मुरुड रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, नांदगाव येथील नागेेशर नगर ते आयुष हॉस्पिटलदरम्यान साईडपट्टी भराव करताना रस्त्यावर आलेली खडी-माती वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे.
मुरुड-जंजिरा पर्यटनामुळे या मार्गावर सातत्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. तसेच तालुयाच्या ठिकाणी व अलिबागकडे ये-जा करणारे विद्यार्थी, कर्मचारी आणि नागरिकांचीही या मार्गावर मोठी वर्दळ असते. रस्त्यावर पसरलेली खडी विशेषतः दुचाकीस्वारांसाठी धोकादायक ठरत असून, वाहन घसरण्याची शयता निर्माण झाली आहे.
रस्त्याच्या कामादरम्यान सुरक्षेची योग्य खबरदारी घेणे आवश्यक असताना संबंधित यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे अपघाताचा धोका वाढला असल्याची नाराजी वाहनचालक व प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन रस्त्यावरील खडी-माती हटवावी, अशी मागणी करण्यात येत आहे. सुरक्षित वाहतुकीसाठी कामाच्या ठिकाणी योग्य उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.