लिव्ह इन रिलेशन पडले महागात ; १९ लाखांचा ऐवज घेऊन तरुणी झाली ‘फुर्र’

अलिबागमधील धक्कादायक प्रकार | पोलिसांत तक्रार

By Raigad Times    01-Sep-2026
Total Views |
ALIBAG
 
अलिबाग | लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणे एका तरुणाला चांगलेच महागात पडल्याची घटना अलिबाग शहरात समोर आली आहे. गेल्या चार महिन्यांपासून त्याच्यासोबत राहणारी तरुणी घरातील तब्बल १९ लाख ५० हजार रुपये किमतीचा ऐवज घेऊन पसार झाल्याची तक्रार अलिबाग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
 
या प्रकरणाची अलिबाग शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणाची कल्याण येथील एका तरुणीसोबत मैत्री होती. या मैत्रीचे रूपांतर लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये झाले. त्यानंतर दोघेही गेल्या सुमारे चार महिन्यांपासून अलिबाग शहरात एकत्र राहत होते. सुरुवातीचा काळ सुरळीत गेल्यानंतर दोघांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण झाले होते. मात्र, या नात्याला १६ ऑगस्ट रोजी अनपेक्षित वळण मिळाले.
 
संबंधित तरुणी घरातील ४ लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा १९ लाख ५० हजार रुपये किमतीचा ऐवज घेऊन अचानक निघून गेली. तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ३१ ऑगस्ट रोजी फिर्यादीने अलिबाग पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. अलिबाग पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक हंबीर करीत आहेत. दरम्यान, अलिबाग शहरात घडलेला हा प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
सावधगिरीही गरजेची
लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये विश्वास महत्त्वाचा असला तरी आर्थिक व्यवहार, वैयक्तिक मालमत्ता याबाबत स्पष्टता आवश्यक आहे. केवळ भावनिक आधारावर आर्थिक व्यवहारांची जबाबदारी दुसर्‍या व्यक्तीकडे सोपवताना सावधगिरी बाळगणेही आवश्यक आहे.