वायशेत येथे शॉर्टसर्किटने घरात आग; महिला जखमी, महावितरणचे दुर्लक्ष

By Raigad Times    01-Sep-2026
Total Views |
ALIBAG
 
अलिबाग | अलिबाग तालुक्यातील वायशेत येथे शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागून घरासह दुकानाचे मोठे नुकसान झाल्याची घटना सोमवारी (३१ ऑगस्ट) घडली. या घटनेत संदीप पाटील यांच्या पत्नी सायली संदीप पाटील जखमी झाल्या असून, त्यांच्यावर अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, वायशेत येथील संदीप पाटील यांच्या घराला अचानक आग लागली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीमध्ये घरातील साहित्य तसेच दुकानाचे नुकसान झाले. आगीच्या घटनेत सायली पाटील जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी अलिबाग सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले.
 
याबाबतची माहिती महावितरणच्या अधिकार्‍यांना देण्यात आली; मात्र तब्बल दोन तास उलटूनही कोणताही अधिकारी घटनास्थळी पोहोचला नसल्याचा आरोप संदीप पाटील यांनी केला आहे. वीज पुरवठ्याची टाकण्यात आलेली असताना ब्रेक असलेली पोल लाईन सुरू ठेवण्याचे कारण काय? असा सवाल त्यांनी केला आहे. या घटनेनंतर महावितरणच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता, "मला यायला वेळ नाही,” असे फोनवरून सांगण्यात आल्याचा दावा पाटील यांनी केला.
 
त्यानंतर अलिबाग येथील अधिकारीही घटनास्थळावरून निघून गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकाराबाबत पोलीस ठाण्यात तक्रार करणार असल्याची माहिती संदीप पाटील यांनी दिली. दरम्यान, आगीमुळे झालेल्या नुकसानीची संबंधितांना मदत मिळावी, तसेच विद्युत यंत्रणेतील त्रुटींची चौकशी करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.