नवी मुंबई | रिक्षाच्या १५० रुपयांच्या भाड्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान १८ वर्षीय रिक्षाचालकाच्या हत्येत झाले. वाशी येथील फोर्टिस रुग्णालयाजवळील मिनी सीशोअर गार्डन परिसरात २९ ऑगस्ट रोजी पहाटे ही धक्कादायक घटना घडली. धारदार शस्त्राने वार करून रिक्षाचालकाची हत्या केल्यानंतर दोन्ही आरोपी रिक्षा घेऊन पसार झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत रिक्षाचालक आणि आरोपी यांच्यात रिक्षाच्या भाड्यावरून वाद झाला. रिक्षाचे भाडे १५० रुपये असल्याचे सांगण्यात येत असून, त्यापैकी ५० रुपयांवरून वाद निर्माण झाला. वाद वाढल्यानंतर आरोपींनी रिक्षाचालकावर धारदार शस्त्राने हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या रिक्षाचालकाचा या हल्ल्यात मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वाशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
आरोपी रिक्षा घेऊन फरार झाल्याने पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक माहितीच्या आधारे त्यांचा माग काढण्यास सुरुवात केली. नवी मुंबई गुन्हे शाखा आणि वाशी पोलिसांच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत दोन्ही आरोपींचा माग काढला. अखेर त्यांना मानखुर्द परिसरातून ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, हत्येमागील नेमका घटनाक्रम आणि आरोपींची भूमिका तपासली जात आहे.