अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल; मनसे आक्रमक

By Raigad Times    01-Sep-2026
Total Views |
new mumbai
 
नवी मुंबई | पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र हटविल्याच्या प्रकरणावरून मनसे नेते अमित ठाकरे यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईनंतर मनसेने राज्य सरकारवर जोरदार टीका केली असून, ‘हा कसला न्याय?’ असा सवाल उपस्थित केला आहे.
 
मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी या कारवाईवर प्रतिक्रिया देताना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी आवाज उठविल्याबद्दल अमित ठाकरे यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा केला. नवी मुंबईनंतर पुण्यातही अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र हटविण्याच्या घटनेनंतर राजकीय वातावरण तापले आहे.
 
या प्रकरणात अमित ठाकरे यांच्यासह मनसेच्या काही कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, काळे यांनी महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या एका जुन्या वक्तव्याचा संदर्भ देत सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श आहेत,’ असे कोश्यारी यांनी म्हटले होते. मात्र, त्या वक्तव्यावर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला नाही, असा दावा काळे यांनी केला.
 
एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी भूमिका घेणार्‍या मनसेच्या नेत्यांवर गुन्हे दाखल केले जातात आणि दुसर्‍या बाजूला महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणार्‍यांवर कारवाई होत नाही, असा आरोप करीत ‘हा कसला न्याय?’ असा सवाल मनसेने सरकारला केला आहे. या प्रकरणामुळे आगामी काळात मनसे आणि राज्य सरकारमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.