अलिबाग | चोंढी येथे शेडमध्ये पार्क केलेल्या इनोव्हा क्रिस्टा कारचा टायर कापडाच्या सहाय्याने पेटवून कार जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कारमालक वासुदेव आमले यांच्या तक्रारीवरुन, गावातील नैनेश गायकवाड याच्याविरोधात मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेसंदर्भातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये संबंधित व्यक्ती कारजवळ संशयास्पदरित्या ये-जा करताना दिसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. चोंढी येथील रहिवासी वासुदेव आमले हे राजनपाडा येथील एसएस पावरटेक प्रा. लि. कंपनीत नोकरीस आहेत. त्यांनी सुमारे तीन महिन्यांपूर्वी सेकंड हँड इनोव्हा क्रिस्टा कार खरेदी केली होती. घराजवळ पार्किंगची जागा नसल्याने ते चोंढी येथील आर. के. हॉस्पिटलसमोरील श्याम कदम यांच्या दुकानासमोरील शेडमध्ये कार पार्क करीत होते. २९ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आमले यांनी कार तेथे पार्क केली.
कारच्या मागील टायरची हवा कमी असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी भावाला सकाळी टायरमध्ये हवा भरण्यासाठी कॉम्प्रेसरची व्यवस्था करण्यास सांगितले. दुसर्या दिवशी पहाटे साडेचारच्या सुमारास कारजवळ गेल्यावर पुढील टायरची हवा कमी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. जवळ जाऊन पाहिले असता टायर जळालेला असल्याचे आढळले. त्यानंतर त्यांनी जळालेला टायर बदलून स्टेपणी लावली आणि कामानिमित्त वाशी येथे गेले.
वाशी येथील काम आटोपून सकाळी साडेअकराच्या सुमारास चोंढीत परतल्यानंतर त्यांनी कारजवळील शैलेश यांच्या गॅरेजच्या बाहेर लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात नैनेश गायकवाड हा हातात काहीतरी वस्तू घेऊन कारच्या दिशेने जाताना आणि परत येताना दिसल्याचे आमले यांनी तक्रारीत म्हटले आहे. यावरून गायकवाड याने कापडाच्या सहाय्याने कारच्या पुढील डाव्या टायरला आग लावून नुकसान केल्याचा संशय आमले यांनी व्यक्त केला आहे.
तसेच भविष्यात आपल्याला व कुटुंबीयांना त्याच्याकडून धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यान, याप्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात नैनेश गायकवाड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.