मांडवा येथे पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेचा विनयभंग

By Raigad Times    05-Aug-2026
Total Views |
 alibag
 
अलिबाग | मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खारपाडा-आगरसुरे मार्गावर एका महिलेशी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने गैरवर्तन करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी तसेच तक्रार केल्यास खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
३ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे पावणेचार वाजण्याच्या सुमारास खारपाडा ते आगरसुरे मार्गावर ही घटना घडली. फिर्यादी महिला या त्यांच्या पतीच्या मामाच्या मुलीसोबत किराणा दुकानातून सामान घेऊन पायी घरी जात असताना आरोपी मोटारसायकलवरून त्यांच्या पाठीमागून आला.
 
त्याने वाहन थांबवून पत्ता विचारण्याचे निमित्त करत विनयभंग तसेच "तू माझ्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार केलीस, तर मी माझ्या पत्नीच्या नावाने तुझ्या पतीविरुद्ध तसाच गुन्हा दाखल करीन,” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.