उरण | उरण तालुक्यात महावितरणच्या नियोजनशून्य कारभारामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचा मोठा फटका बसत आहे.
उरण शहरासह कळंबुसरे, मोठी जुई, कोप्रोली, पिरकोण, सारडे, वशेणी, बांधपाडा, चाणजे, नवघर, जासई आणि चिरनेर परिसरातील अनेक गावांमध्ये रात्री- अपरात्री वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या समस्येमुळे अनेक ठिकाणी रात्रभर अंधाराचे साम्राज्य पसरत असून, सकाळपर्यंतही वीजपुरवठा पूर्ववत होत नसल्याच्या तक्रारी आहेत.
पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, विद्यार्थ्यांचा अभ्यास, व्यापारी व्यवहार आणि लघुउद्योग यावर त्याचा प्रतिकूल परिणाम होत आहे. याहून गंभीर बाब म्हणजे, काही भागांत उच्च दाबाने वीजपुरवठा झाल्यामुळे टीव्ही, फ्रिज, एसी, इन्व्हर्टर, पंखे, पाण्याच्या मोटारी, संगणक यांसह अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या नुकसानीचा पंचनामा करून ग्राहकांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
अनियमित वीजपुरवठा असूनही महावितरणकडून अव्वाच्या सव्वा वीजबिले पाठविली जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. "वीज नाही, पण बिल मात्र वेळेवर” अशी उपरोधिक प्रतिक्रिया नागरिकव्यक्त करत आहेत. वीज समस्येबाबत पनवेल येथे लोकप्रतिनिधी आणि महावितरण अधिकार्यांची बैठक होऊन सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल न झाल्याने महावितरणच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधींकडूनही या प्रश्नावर प्रभावी पाठपुरावा होत नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. महावितरणने दोषपूर्ण वीजवाहिन्या, ट्रान्सफॉर्मर आणि वितरण यंत्रणेची तातडीने दुरुस्ती करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही उरण तालुक्यातील ग्रामस्थांनी दिला आहे.