श्रीवर्धन | श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या आरोग्य सहाय्यकाला पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. मंगळवारी (४ ऑगस्ट) अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ही कारवाई केली. घनश्याम कोमटवार (वय २२) असे अटक करण्यात आलेल्या कर्मचार्याचे नाव आहे.
तक्रारदाराकडे वैद्यकीय व्यवसायाबाबत संशय व्यक्त करत, "तू बोगस डॉक्टर आहेस. दहा हजार रुपये दे, अन्यथा तुझ्यावर धाड टाकीन,” अशी धमकी देत आरोग्य सहाय्यक घनश्याम कोमटवार याने लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदाराने अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर मंगळवारी एसीबीने सापळा रचला. प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी असल्याने तक्रारदाराने आरोपीला आरोग्य केंद्रासमोरील रस्त्यावर बोलावले. तेथे तडजोडीनंतर ठरलेली पाच हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. घनश्याम कोमटवार हा बोर्लीपंचतन प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सहाय्यक या तृतीय श्रेणी पदावर कार्यरत आहे.
याप्रकरणी अन्य कोणाचा सहभाग किंवा वरिष्ठांचा हस्तक्षेप होता का? याबाबतही तपास होण्याची गरज व्यक्त केली जात आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. याप्रकरणी दिघी सागरी पोलीस ठाण्यात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.