महाड | गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खाडीपट्ट्यातील नद्या, खाड्या आणि तलावांमध्ये आलेल्या पुराचा परिणाम आता दिसून येत असून, महाड तालुक्यातील चिंभावे मोहल्ला गावाच्या प्रवेशद्वाराजवळील तलावात दोन मोठ्या मगरींचा वावर आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामपंचायत इमारतीलगत असलेल्या या तलावात अंदाजे सात फूट लांबीच्या दोन मगरी असल्याचा दावा स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. शनिवारी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास तलावाच्या काठावरील धक्क्यावर एक मगर ऊन खात बसलेली दिसली. जवळपास तासभर ती तेथेच थांबल्यानंतर हळूहळू तलावात परत गेली. मात्र ती पुन्हा कधी बाहेर येईल याचा अंदाज नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीती वाढली आहे.
ग्रामपंचायतचे माजी सदस्य सुफियान समनाके यांनी तलावात दोन मगरींचा वावर असल्याची माहिती दिली. हा तलाव गावाच्या मुख्य प्रवेशद्वारालगत असून ग्रामपंचायत कार्यालय, घरांची वस्ती तसेच शाळकरी मुलांचा आणि नागरिकांचा मुख्य रहदारीचा मार्ग याच परिसरातून जात असल्याने संभाव्य धोका अधिक गंभीर मानला जात आहे. शाळकरी मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच एसटी स्थानकाकडे जाणारे प्रवासी या मार्गाचा नियमित वापर करतात.
त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. परिसरात भीतीचे वातावरण असल्याने नागरिकांनी विशेषतः लहान मुलांना तलावाच्या परिसरापासून दूर ठेवण्याचे आवाहनही केले आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून ग्रामस्थांनी तलाव परिसरात तात्पुरते इशारा फलक लावून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
तसेच वन विभागाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पिंजरा लावावा, मगरींच्या हालचालींवर लक्ष ठेवावे आणि कायमस्वरूपी सूचना फलक उभारून जनजागृती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, ग्रामपंचायत उपसरपंच मुजाहिद हासपटेल यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीमार्फत वन विभागाकडे अधिकृत पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
याबाबत महाड वनपरिक्षेत्र कार्यालयातील सचिन मेने यांनी सांगितले की, नागरिकांकडून माहिती प्राप्त झाली असून सोमवारी दुपारनंतर घटनास्थळी पाहणी करण्यात येणार आहे. तलावात सध्या पाणी असल्यामुळे मगरींना पकडणे तातडीने शक्य नसले तरी परिसरात सावधानतेचे फलक लावणे, नागरिकांना आवश्यक सूचना देणे आणि परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवणे याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच परिस्थितीनुसार पुढील उपाययोजनाही करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.