पेण | भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दळवी यांच्यासह चौघांविरोधात पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्ववैमनस्यातून फिर्यादी यांना जबर मारहाण करणे, धमकावणे आणि शस्त्र रोखल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेण पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
पेण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार कुरमुली येथील मयूर केसरीनाथ वनगे यांच्या फार्महाऊसवर सदर घटना घडली. मयूर वनगे हे स्वयंपाक घरात जेवण आणण्यासाठी थांबले होते. यावेळी मंगेश दळवी, हरेश दळवी आणि रुपेश दळवी आणि रंजीत दळवी हे त्या ठिकाणी आले.
पूर्वीच्या वादाचा राग धरून त्यांनी फिर्यादी यांना लोखांडी रॉडने मारहाण केली. नंतर स्वयंपाकी आणि त्याचे वडील यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली. नंतर धारधार शस्त्राने वार करून दुखापती केल्या, नंतर रिव्हॉल्वर काढून धमकावले. ठार मारण्याची धमकी दिली. फिर्यादी यांच्या खिशातून पडलेली ८० हजार रुपयांची रक्कम काढून घेतली. तसेच गळ्याची चेन काढून घेत धमकी दिली असे वनगे यांनी दाखल केलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या तक्रारी नुसार चारही जणांविरोधात पेण पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कलम ३(२५), ४(२५) आणि भारतीय न्याय संहिता कमल ११८(२), ११९(१), ३१४, ३५१(३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपुत या प्रकरणाचा तपास करत आहेत.