खोपोली । खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रसिद्ध केपी वॉटरफॉल येथे वर्षासहलीसाठी आलेल्या ठाण्यातील चार मित्रांपैकी एका तरुणाचा निसरड्या ठिकाणी पाय घसरून सुमारे 40 ते 45 फूट खोल दरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (2 ऑगस्ट) सायंकाळी घडली.
रात्रभर सुरू असलेल्या शोधमोहिमेनंतर सोमवारी पहाटे सुमारे 3 वाजता संबंधित तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृताचे नाव अभिषेक कुसवाहा (वय 23, रा. ठाणे) असे असून, त्याच्यासोबत आलेले साहील हरिजन (17), देवा गायधनकर (22) आणि साहील (19) हे तिघेही सुखरूप आहेत. या घटनेची नोंद खोपोली पोलिसांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील चार मित्र वर्षासहलीचा आनंद घेण्यासाठी केपी वॉटरफॉल येथे आले होते. धबधबा पाहून परतत असताना अभिषेक निसरड्या कड्यावरून खाली उतरत असताना त्याचा तोल गेला आणि तो सुमारे 40 ते 45 फूट खोल दरीत कोसळला. त्याच्या मित्रांनी झेनिथ ठाकूरवाडी येथे येऊन स्थानिकांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर खोपोली पोलीस, हेल्प फाऊंडेशनचे सदस्य आणि स्थानिक बचाव पथकाने तातडीने शोधमोहीम सुरू केली. अखेर सोमवारी (3 ऑगस्ट) पहाटे अभिषेकचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला.