संस्कृतीच्या विनाशात एचआयव्हीची वाढती दहशत

By Raigad Times    04-Aug-2026
Total Views |
lekh
 
उमाजी म. केळुसकर | ज्येष्ठ पत्रकार | महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणारी एक अत्यंत चिंताजनक बातमी राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक सुमारे पावणेचार लाख, आंध्र प्रदेशात पावणेतीन लाख आणि कर्नाटकमध्ये तिसर्‍या क्रमांकावर एचआयव्ही बाधित रुग्ण असतानाच, कर्नाटकातील 18 ते 25 वयोगटातील तब्बल सात हजार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संसर्ग झाल्याचे अत्यंत धक्कादायक वास्तव उघड झाले आहे.
 
हा केवळ एक वैद्यकीय आकडा नसून आजच्या तरुण पिढीच्या दिशाहीन जीवनशैलीवर, स्वैराचारावर आणि ढासळत्या कौटुंबिक व सामाजिक मूल्यांवर उपस्थित झालेले एक अत्यंत गंभीर प्रश्नचिन्ह आहे. आधुनिकतेच्या आंधळ्या प्रभावातून रुजणार्‍या या अनियंत्रित प्रवृत्तीचे दुष्परिणाम रोखण्यासाठी संपूर्ण समाजाला तात्काळ सखोल आत्मपरीक्षणाची आणि सुसंस्कृत मूल्यांची नितांत गरज आहे.
 
शिक्षणाची आणि उज्ज्वल भविष्याची स्वप्ने उराशी बाळगून महाविद्यालयांत पाऊल ठेवणार्‍या तरुण पिढीबद्दल अत्यंत अस्वस्थ करणारी एक बातमी समोर आली आहे. जिने केवळ आरोग्य क्षेत्रालाच नव्हे तर संपूर्ण सामाजिक व्यवस्थेला हादरवून सोडले आहे. कर्नाटक राज्यातील 18 ते 25 वयोगटातील, विशेषतः महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणार्‍या तब्बल सात हजार विद्यार्थ्यांना एचआयव्ही संसर्ग झाल्याची धक्कादायक आकडेवारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय आरोग्य सर्वे क्षणांमधून उजेडात आली आहे.
 
नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन (नाको) आणि राज्य एड्स नियंत्रण संस्थांच्या अहवालानुसार, देशात एचआयव्ही रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत महाराष्ट्र आजही जवळपास साडेतीन ते चार लाख रुग्णांसह देशात आघाडीवर आहे, तर आंध्र प्रदेश सुमारे सव्वादोन ते अडीच लाख रुग्णांसह दुसर्‍या क्रमांकावर आणि कर्नाटक तिसर्‍या क्रमांकावर विराजमान आहे. असे असतानाही, कर्नाटकातील या नव्या सर्वेक्षणाने जी धोक्याची घंटा वाजवली आहे, ती केवळ एका राज्यापुरती किंवा आरोग्यविषयक आकडेवारीपुरती मर्यादित नसून ती आजच्या आधुनिक तरुण पिढीच्या बदलत्या जीवनशैलीवर, त्यांच्या भविष्यावर आणि एकूणच सामाजिक नैतिकतेवर उपस्थित झालेले एक मोठे प्रश्नचिन्ह आहे.
 
या समस्येचे मूळ शोधताना केवळ वैद्यकीय कारणांपुरते मर्यादित न राहता, आजची तरुण पिढी ज्या अनियंत्रित मार्गाने वाटचाल करत आहे, त्याचे मूळ कारण शोधणे आणि त्यावर गांभीर्याने आत्मपरीक्षण करणे आज काळाची सर्वात मोठी गरज बनली आहे. जेव्हा अशा प्रकारच्या आरोग्यविषयक समस्या शैक्षणिक संस्थांमधून किंवा उच्च शिक्षण घेणार्‍या वर्गातून पुढे येतात, तेव्हा समाज म्हणून आपण नेमके कुठे कमी पडत आहोत, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
 
कर्नाटकात समोर आलेल्या या सर्वेक्षणामध्ये केवळ एचआयव्हीचा वाढता प्रादुर्भाव समोर आलेला नाही, तर त्यामागील कारणांमध्ये बदललेली जीवनशैली, मल्टिपल पार्टनरशिपची संकल्पना, समलैंगिक संबंधांमधील वाढ आणि लिव्ह-इन रिलेशनशिपसारख्या आधुनिक प्रवाहांचा अतिरेक अधोरेखित झाला आहे. आजच्या डिजिटल युगात तरुणांच्या हातामध्ये अमर्याद स्वातंत्र्य आणि माहितीचे महाजाळे उपलब्ध झाले आहे, परंतु याच स्वातंत्र्याचा योग्य वापर कसा करावा याचे भान मात्र बहुतांश वेळा सुटत चालले आहे.
 
जेव्हा आधुनिकतेच्या नावाखाली प्रत्येक गोष्टीला वैयक्तिक स्वातंत्र्य किंवा चॉईस म्हणून मान्यता दिली जाते, तेव्हा त्यामागे दडलेले धोके आणि त्याचे दूरगामी सामाजिक दुष्परिणाम सहजपणे दुर्लक्षित केले जातात. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, या संपूर्ण विषयावर विचार करताना आजही आपल्या समाजात दोन टोकाच्या प्रतिक्रिया उमटताना दिसतात. एका बाजूला या समस्येमागे सरकारला किंवा यंत्रणेला जबाबदार धरून राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जातो, तर दुसर्‍या बाजूला वैयक्तिक स्वातंत्र्याच्या नावाखाली या सर्व विकृतींचे विनाकारण उदात्तीकरण केले जाते.
 
कोणत्याही समस्येचे मूळ कारण समजून न घेता त्यावर तात्कालिक राजकीय किंवा वैचारिक पडदा टाकणे हा त्यावरचा उपाय असू शकत नाही. आजच्या या गतिमान जगात प्रसारमाध्यमे, चित्रपट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा तरुणाईच्या मनावर होणारा प्रभाव अत्यंत खोलवर आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आणि प्रगतशील विचारांच्या नावाखाली अनेकदा अशा जीवनशैलीचे समर्थन केले जाते, जिथे लाज, भीती, मर्यादा आणि उच्च मूल्ये यांना कोणतेही स्थान उरत नाही.
 
चित्रपटांमध्ये किंवा वेब सिरीजमध्ये दाखवल्या जाणार्‍या आधुनिक संबंधांच्या संकल्पना तरुणांच्या कोमल मनावर विपरीत परिणाम घडवून आणतात. रात्रीच्या लेट-नाईट पाटर्या, अमर्याद मोकळीक आणि तात्कालिक आनंदाच्या शोधात वाहवत जाणारी तरुणई आपले आरोग्य आणि आयुष्य धोक्यात घालायला लागली आहे. या सर्व प्रवाहात जेव्हा कोणी व्यक्ती किंवा विचारवंत या अनियंत्रित स्वैराचारावर बोट ठेवतो, तेव्हा त्याला लगेचच बुरसटलेल्या विचारांचा, जुन्या काळातील किंवा पुरुषसत्ताक मानसिकतेचा असे लेबल लावून हिणवले जाते.
 
ही बौद्धिक असहिष्णुता आणि आधुनिकतेचा अतिरेक समाजाला एका विनाशाच्या गर्ते त घेऊन जात आहे. या संपूर्ण परिस्थितीचे मूळ आपल्या कौटुंबिक व्यवस्था आणि शिक्षण पद्धतीत दडलेले आहे. आज पालकवर्ग आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्यात, त्यांना भौतिक सुखसोयी पुरवण्यात आणि स्पर्धात्मक जगात पुढे रेटण्यात यशस्वी ठरत आहे, परंतु त्यांच्यात योग्य संस्कार, विवेक आणि आत्मसंयम रुजवण्याच्या बाबतीत कोठे ना कुठे कमी पडत आहे. आधुनिकतेचे अंधानुकरण करणे म्हणजे प्रगती नव्हे. खरी प्रगती ती असते, जी विज्ञानाची आणि आधुनिकतेची कास धरत असताना आपल्या प्राचीन मूल्यांचा, संस्कारी वारशाचा आणि नैतिकतेचा विसर पडू देत नाही. आज पालकांचा मुलांमधील संवाद तुटत चालला आहे.
 
अनेकदा पालक आपल्या मुलांच्या चुकीच्या वागण्याकडे दुर्लक्ष करतात किंवा त्याला आधुनिकतेचे नाव देऊन मोकळे होतात. परिणामी, जेव्हा परिस्थिती हातातून निघून जाते, तेव्हा केवळ पश्चाताप करण्याशिवाय पालकांकडे काही उरत नाही. मुलांवर लहानपणापासूनच योग्य संस्कार करणे, त्यांना संकटांचा सामना करण्याचे धैर्य देणे आणि अधिकारांसोबतच कर्तव्याची जाणीव करून देणे हे पालक आणि कुटुंबाचे प्राथमिक कर्तव्य आहे. या समस्येवर केवळ कायदे करून, निरोध वाटून किंवा वरवरचे प्रतिबंधात्मक उपाय योजून नियंत्रण मिळवता येणार नाही.
 
एचआयव्ही सारख्या आजारांवर प्रिव्हेंशन हा वैद्यकीय उपाय असला, तरी नैतिक पतनावर आणि विचारांच्या घसरणीवर मात करण्यासाठी मूल्यशिक्षणाची आणि आत्मसंयमनाची गरज आहे. आज गरज आहे ती एका सुवर्णमध्याची. अति-आधुनिकता आणि अति-सनातनीपणा या दोन्ही टोकांच्या भूमिका बाजूला सारून एका विवेकवादी आणि संतुलित समाजाची निर्मिती करणे काळाची गरज आहे. तरुणांना केवळ मोकळीक देण्याऐवजी त्यांना योग्य आणि अयोग्य यातील भेद समजून सांगणारी वैचारिक शिदोरी देणे ही काळाची मागणी आहे.
 
धर्माचे, परंपरेचे आणि संस्कारी मूल्यांचे योग्य अधिष्ठान जर तरुण पिढीला मिळाले नाही, तर कोणतीही भौतिक प्रगती किंवा आर्थिक संपन्नता राष्ट्राला वाचवू शकणार नाही. हा प्रश्न केवळ एका राज्यापुरता किंवा एका घटकापुरता मर्यादित नसून, संपूर्ण राष्ट्राच्या आणि संस्कृतीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. वेळीच सावध होऊन जर आपण या नैतिक पडझडीकडे पाहिले नाही, तर येणारी पिढी केवळ आरोग्याच्याच नव्हे, तर विचारांच्या आणिसंस्कारांच्या पातळीवरही पूर्णपणे कोलमडून जाईल. त्यामुळे प्रत्येकाने आत्मपरीक्षण करून आपल्या भावी पिढीला सुसंस्कृत, सभ्य आणि जबाबदार नागरिक बनवण्यासाठी कटिबद्ध होण्याची हीच ती योग्य वेळ आहे.