कर्जत । गेल्या तब्बल 12 वर्षांपासून बंद असलेली नेरळ-वाकस-कशेळे एसटी बससेवा अखेर सोमवार, दि. 3 ऑगस्टपासून पुन्हा सुरू करण्यात आली. विद्यार्थ्यांसह शेतकरी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातील नागरिकांची दीर्घकाळची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली असून, या मार्गावर दररोज आठ फेर्या धावणार असल्याने परिसरातील वाहतुकीला मोठा दिलासा मिळाला आहे.
नेरळ बसस्थानकात मुसळधार पावसात झालेल्या उद्घाटन सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्या बसला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आले. पहिल्याच दिवशी प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, बस प्रवाशांनी पूर्ण भरून धावली. नेरळ-वाकस-कशेळे मार्गावरील बससेवा बंद असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, शेतकर्यांना बाजारपेठेत जाण्यासाठी, नोकरदारांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना दैनंदिन प्रवासासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
ही सेवा पुन्हा सुरू व्हावी यासाठी कर्जत प्रेस असोसिएशन यांनी सातत्याने पाठपुरावा केला. या मागणीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) कर्जत तालुका तसेच किसान क्रांती संघटना, महाराष्ट्र राज्य कर्जत तालुका यांनी सक्रिय पाठिंबा दिला. विविध स्तरांवर केलेल्या पाठपुराव्यानंतर एसटी प्रशासनाने या मार्गावर बससेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. उद्घाटनप्रसंगी नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे, आगार व्यवस्थापक पृथ्वीराज भुताळे, स्थानिक प्रमुख देवानंद मोरे तसेच सहाय्यक वाहतूक निरीक्षक महादेव पालवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते बससेवेचे उद्घाटन करण्यात आले. या बससेवेच्या प्रारंभामुळे नेरळ, वाकस, कशेळे आणि परिसरातील गावांतील नागरिकांना सुरक्षित, नियमित आणि परवडणारी वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे. विशेषतः विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात जाणे अधिक सोयीचे होणार असून, शेतकर्यांना बाजारपेठेत पोहोचणे आणि सर्वसामान्य नागरिकांचा दैनंदिन प्रवासही सुलभ होणार आहे.
त्यामुळे परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. उद्घाटन सोहळ्यास कर्जत प्रेस असोसिएशनचे विश्वस्त संतोष पेरणे, अध्यक्ष भूषण प्रधान, किशोर गायकवाड, कैलास मामले, रोशन दगडे, जगदीश दगडे, महेश भगत, रामदास माळी, संदेश साळुंखे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. तसेच किसान क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरत राणे, तालुकाध्यक्ष शरद तवले, काशिनाथ धुळे व अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे मारुती गायकवाड, सुरेखा कांबळे, भालचंद्र गायकवाड, सुभाष पवार, अनंत गायकवाड, रवींद्र गायकवाड यांच्यासह कार्यकर्त्यांनीही उपस्थिती लावली. दरम्यान, या मार्गावरील पहिली बस वाहनचालक प्रशांत शिंदे आणि वाहक दीपा भवारे यांच्या सेवेत धावली. पहिल्याच दिवशी बसला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने ही सेवा ग्रामीण भागासाठी किती आवश्यक होती, याची प्रचिती पुन्हा एकदा आली.