वाहनाच्या धडकेने पालीतील पाच वीज खांब कोसळल

By Raigad Times    04-Aug-2026
Total Views |
 pali
 
सुधागड-पाली । पाली येथील श्री बल्लाळेश्वर गणपती मंदिर परिसरात सोमवारी (3 ऑगस्ट) सकाळी सुमारे साडेआठ वाजण्याच्यादरम्यान अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेमुळे सलग पाच विद्युत खांब जमिनीवर कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
 
सुदैवाने सकाळची वेळ असल्याने रस्त्यावर वर्दळ कमी होती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. ही घटना श्री बल्लाळेश्वर गणपती मंदिराच्या प्रवेशद्वारापासून भक्तनिवासाकडे जाणार्‍या मार्गावर घडली. विद्युत खांब कोसळल्याने मंदिर परिसरात ये-जा करणार्‍या भाविकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
 
पालीचे नगराध्यक्ष पराग मेहता यांनी तात्काळ महावितरणच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली आणि आवश्यक सूचना दिल्या. त्यानंतर महावितरणचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तत्काळ वीजपुरवठा खंडित करण्यात आला. कोसळलेले खांब हटविणे, विद्युत तारा सुरक्षित करणे, वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले.