‘मातोश्री’वर गटबाजी;ठाकरेंचा संताप ; पदाधिकार्‍यांच्या शाब्दीक वादानंतर उद्धव ठाकरेंची कानउघाडणी

By Raigad Times    04-Aug-2026
Total Views |
 mumbai
 
मुंबई । शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची ठाणे जिल्ह्यातील संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि नव्या पदाधिकार्‍यांच्या नियुक्तीबाबत ‘मातोश्री’वर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत अंतर्गत गटबाजी उफाळून आली. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीतच ठाण्यातील दोन गटांच्या पदाधिकार्‍यांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला.
 
या प्रकारामुळे उद्धव ठाकरे संतप्त झाले आणि त्यांनी पदाधिकार्‍यांची खरडपट्टी काढली. ही बैठक ठाण्यातील कळवा आणि कल्याण विधानसभा मतदारसंघातील पक्षसंघटनेचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, कल्याणमधील काही पदाधिकार्‍यांच्या अलीकडील हकालपट्टीच्या मुद्द्यावरून वादाला सुरुवात झाली.
 
जुने आणि नव्याने नियुक्त होणारे पदाधिकारी यांच्यातील मतभेद बैठकीत उघडपणे समोर आले. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, देशात एक तरुण आंदोलनातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देत आहे आणि तुम्ही इथे पदांसाठी आपापसात भांडत आहात, अशा शब्दांत पदाधिकार्‍यांना सुनावल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 
बैठकीला ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत, आमदार मिलिंद नार्वे कर आणि माजी आमदार विलास पोतनीस यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या घटनेनंतर ठाणे जिल्ह्यातील अंतर्गत गटबाजी रोखण्यासाठी पक्ष नेतृत्व कोणती पावले उचलते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.