कोल्हापूर । कागल तालुक्यातील सुळकूड येथे टेरेसवर खेळत असताना उच्चदाबाच्या वीजवाहिनीचा स्पर्श झाल्याने 9 वर्षीय शर्विल सागर महादेव याचा दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्विल हा मित्रांसोबत लपाछपी खेळत असताना शेजारील घराच्या टेरेसवर गेला. यावेळी घरालगत असलेल्या उच्चदाबाच्या वीजवाहिनीचा त्याच्या हाताला स्पर्श झाला आणि त्याला जोरदार विजेचा धक्का बसला. ग्रामस्थांनी त्याला तातडीने कागल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकार्यांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
याप्रकरणी कागल पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून सहायक फौजदार डोईफोडे पुढील तपास करत आहेत. दरम्यान, शर्विलच्या कुटुंबाने नुकतेच नवीन घर बांधले होते. त्या घराची वास्तुशांती श्रावण महिन्यात करण्याची तयारी सुरू असतानाच या दुर्दैवी घटनेने महादेव कुटुंबावर शोककळा पसरली आहे. शर्विल चौथी इयत्तेत शिक्षण घेत होता. त्याच्या पश्चात आई-वडील, बहीण आणि आजोबा असा परिवार आहे.