राजिपच्या 51 शाळापनवेल मनपाकडे जाणार ; जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर

51 शाळांचे ठरले 55 कोटी मूल्यांकन!

By Raigad Times    04-Aug-2026
Total Views |
alibag
अलिबाग । पनवेल महापालिकेच्या हद्दीतील रायगड जिल्हा परिषदेच्या 51 शाळा सशुल्क महापालिकेकडे हस्तांतरीत करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. या शाळांच्या जागांचे मूल्य सुमारे 55 कोटी रुपये इतके असल्याचे सांगण्यात आले आहे.
 
ही रक्कम जिल्हा परिषदेच्या तिजोरीत जमा होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी सभागृहाला दिली. रायगड जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी (3 ऑगस्ट) जिल्हा परिषदेत पार पडली. सभेच्या प्रारंभी अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळच्या विषयांना मंजुरी देण्यात आली. त्यानंतर मागील सभेचे इतिवृत्त मंजूर करण्यात आले. विविध विभागांच्या प्रशासकीय विषयांवर चर्चा करुन आवश्यक मंजुरी देण्यात आली.
 
या सभेत एकूण 22 वेगवेगळे विषय पत्रिकेवर होते. विषयांमध्ये महिला व बालकल्याण विभागाच्या 20 टक्के जिल्हा परिषद सेस निधीतील योजनांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता, ग्रामपंचायतींसाठी सौरऊर्जा प्रकल्प, स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी अनुदान, तसेच जिल्हा परिषद शाळांमध्ये संगणक, प्रोजेक्टर, यूपीएस आणि स्मार्ट अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेअर खरेदीस मंजुरी देण्यात आली.
 
या सभेत पनवेल महानगरपालिका हद्दीतील जिल्हा परिषद शाळांच्या जागा महापालिकेकडे वर्ग करण्याच्या ठरावावरून मोठी चर्चा रंगली. या विषयावर जिल्हा परिषद सदस्य अमित नाईक यांनीही काही प्रश्न उपस्थित केले. अन्य सदस्यांनीही आपली भूमिका मांडताना, जागांचे क्षेत्रफळ, बाजारमूल्य, रेडी रेकनरनुसार किंमत आणि जिल्हा परिषदेला होणारा आर्थिक फायदा याबाबत सविस्तर माहिती सभागृहासमोर ठेवण्याची मागणी केली.
 
तसेच या जागा केवळ शैक्षणिक कामासाठी वापरल्या जाव्यात असेही म्हटले आहे. दरम्यान, अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी, शाळा पनवेल महापालिकेकडे गेल्या तर अधिक चांगल्या सुविधा विद्यार्थ्यांना मिळतील, असा विश्वास व्यक्त केला. यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळा हस्तांतरणाचा ठराव मंजूर करण्यात आला.
शाळांचे 55 कोटींचे बाजारमूल्य; तिजोरीत येणार अवघे 18 कोटी
जिल्हा परिषदेच्या 51 शाळांचे 55 कोटी इतके मूल्य झाले असले तरी, प्रत्यक्षात केवळ 18 कोटीच हाती येण्याची शक्यता आहे. महापालिकेचा 22 कोटी रुपये टॅक्स जिल्हा परिषद देणे आहे. तसेच आतापर्यंत जि.प.च्या शाळांवर दहा कोटी रुपये खर्च केल्याचे महापालिकेडून सांगण्यात आले आहे. ही रक्कम कापून घेतल्यास 55 कोटींपैकी 18 कोटी जिल्हा परिषदेच्या हातात येण्याची शक्यता आहे.
शाळांची एकूण जागा किती?
पनवेल महापालिका हद्दीत जिल्हा परिषदेच्या सुमारे अडिचशे कोटींच्या मालमत्ता आहेत. यामध्ये 51 शाळांचाही समावेश आहे. या शाळा देताना आणि मूल्य ठरविताना, या शाळांची एकूण जागा किती आहे? आणि त्यांचे आजचे मूल्य किती? हे प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहेत.