नवी मुंबई | वाशी येथील मिनी सी-शोर परिसरात शनिवारी पहाटेच्या सुमारास १९ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सुजलकुमार महातो असे मृत तरुणाचे नाव असून, तो कोपरखैरणे येथील एका चायनीज हॉटेलमध्ये काम करत होता.
प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी पहाटे चारच्या सुमारास सुजलकुमार याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच वाशी पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
त्यानंतर गुन्हे शाखेचे पथक तसेच फॉरेन्सिक तज्ज्ञांचे पथकही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक पुरावे संकलित केले आहेत. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. हल्ल्याच्या वेळी परिसरात कोणाची ये-जा झाली, तसेच मृत तरुणाच्या संपर्कात कोण होते, याची माहितीही पोलिसांकडून घेत आहेत. वर्दळीच्या परिसरात घडलेल्या या हत्येच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात येईल, या दृष्टीने तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात येत आहेत.