पेण | गणेश चतुर्थीला अवघे काही दिवस उरले आहेत. मूर्ती कारखान्यांमध्ये अंतिम टप्प्यातील कामाला वेग आला आहे. गणेशमूर्तींचे माहेरघर म्हणून देशभरात लौकिक असलेल्या पेणमधून सुमारे ३० लाख गणेशमूर्तींची विक्री झाली असून यातून साधारण १०० कोटी रुपयांच्या उलाढालीचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून पेणच्या पारंपरिक मूर्तिकला उद्योगाला मोठी आर्थिक चालना मिळण्याची शक्यता आहे.पेणमधील गणेशमूर्ती उद्योगाची रचना केवळ मूर्ती तयार करण्यापुरती मर्यादित नाही. मूर्तीची संकल्पना व साचे तयार करणे, मातीची प्रक्रिया, मूर्ती घडविणे, वाळवणे, रंगकाम, कलात्मक नक्षीकाम, सजावट, पॅकिंग आणि त्यानंतरची वाहतूक अशा अनेक टप्प्यांतून एक मूर्ती बाजारपेठेत पोहोचते.
या संपूर्ण प्रक्रियेत मूर्तिकार, कारागीर, रंगकाम करणारे कामगार, सजावटकार, पॅकिंग कर्मचारी, वाहनचालक आणि वाहतूक व्यावसायिक अशा विविध घटकांचा सहभाग असतो. गणेशोत्सव जसजसा जवळ येतो तसतशी कारखान्यांवरील उत्पादनाची वेळेची मर्यादा वाढते.
मोठ्या प्रमाणातील मागणी पूर्ण करण्यासाठी मूर्तींचे आकार, वजन आणि ग्राहकांच्या पसंतीनुसार उत्पादनाचे नियोजन केले जाते. घरगुती गणपतींपासून सार्वजनिक मंडळांच्या मोठ्या मूर्तींपर्यंत विविध प्रकारच्या मूर्तींची निर्मिती केली जाते. त्यामुळे या व्यवसायाची आर्थिक उलाढाल केवळ मूर्तीच्या विक्रीपुरती न राहता त्यासोबत जोडलेल्या पूरक व्यवसायांमध्येही फिरते.
राज्यभरातून मागणी
पेणच्या मूर्तींना मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक,कोकणासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून मागणी असते. गणेशोत्सवाच्या आधी मोठ्या प्रमाणावर मूर्तींची वाहतूक होत असल्याने पेणमधून राज्याच्या विविध भागांकडे जाणार्या वाहनांची संख्याही वाढते. मूर्ती सुरक्षितपणे ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पॅकिंग आणि वाहतुकीची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असते.
परंपरेसोबत आधुनिकतेची जोड
पारंपरिक पेणच्या गणेशमूर्तींची ओळख कायम ठेवत मूर्तिकारांनी बदलत्या बाजारपेठेची गरजही स्वीकारली आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार मूर्तींच्या चेहर्यावरील भाव, रंगसंगती, अलंकार, आसन आणि सजावटीत विविध प्रयोग केले जात आहेत. मात्र, या बदलांसोबत पारंपरिक कारागिरीचा गाभा कायम ठेवण्याचे आव्हानही मूर्तिकारांसमोर असतो.
यंदाच्या हंगामात ३० लाख मूर्तींच्या विक्रीतून १०० कोटींची अपेक्षित उलाढाल हा आकडा पेणच्या मूर्तीकला उद्योगाचे आर्थिक महत्त्व अधोरेखित करणारा आहे. गणेशोत्सवाच्या काही दिवसांत होणारी ही उलाढाल स्थानिक अर्थव्यवस्थेतील अनेक घटकांना थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार व व्यवसायाची संधी उपलब्ध करून देते. त्यामुळे गणरायाच्या आगमनापूर्वी पेणमध्ये धार्मिक उत्साहाबरोबरच कोट्यवधींच्या अर्थचक्रालाही वेग आला आहे.