महाड | महाड विधानसभा मतदारसंघात भरत गोगावले आणि त्यांच्या पुत्राची ‘हुकूमशाही’ सुरू आहे. त्यांची काम करण्याची पद्धत थांबवण्यासाठीच खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची भुमिका शिवसेना ठाकरे गटाचे महाड विधानसभा समन्वयक तथा शिरगावचे सरपंच सोमनाथ ओझर्डे स्पष्ट केली.
सोमनाथ ओझर्डे यांनी सुतारवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. ओझर्डे यांच्या प्रवेशामुळे महाड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढल्याचा दावा पक्षाकडून करण्यात येत आहे.
सोमनाथ ओझर्डे हे मंत्री भरतशेठ गोगावले आणि त्यांचे पुत्र तथा युवा सेना नेते विकास गोगावले यांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून महाडच्या राजकारणात परिचित आहेत. त्यामुळे त्यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश हा केवळ पक्षबदल न मानता महाडच्या आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. ‘गोगावले यांचे कट्टर विरोधक होतो, आहोत आणि यापुढेही राहू,’ असा स्पष्ट इशाराही ओझर्डे यांनी यावेळी दिला.
महाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला आलेली मरगळ झटकून पक्षाचा झंझावात निर्माण करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी सोमनाथ ओझर्डे यांचे स्वागत करताना ते जनाधार असलेले युवा नेतृत्व असल्याचे सांगितले. कामाची चुणूक दाखवत त्यांनी स्वतःची राजकीय ओळख निर्माण केली आहे. गेली अनेक वर्षे ते शिवसेना ठाकरे गटाचे काम करीत होते. एकेकाळी त्यांनी आपल्यासोबतही काम केले असून आता रायगड लोकसभा मतदारसंघाच्या अध्यक्षा स्नेहल जगताप यांच्या नेतृत्वाखाली ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत असल्याचा आनंद असल्याचे तटकरे यांनी सांगितले.
‘तटकरेंनी दिलेले पालकमंत्री पद!
दरम्यान, ओझर्डे यांनी भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद मिळण्यामागे खासदार सुनील तटकरे यांची भूमिका असल्याचा उल्लेख करत राजकीय टोला लगावला. ‘सुनील तटकरे यांनी दिलेले पालकमंत्री पद असल्याने पालकमंत्री म्हणून आम्ही त्यांच्यासोबत राहू,’ असे वक्तव्य त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाडच्या राजकारणात चर्चेला आणखी उधाण आले आहे. पक्षप्रवेशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रायगड लोकसभा अध्यक्ष स्नेहल जगताप कामत, प्रदेश सरचिटणीस हनुमंत जगताप, जिल्हा प्रवक्ते धनंजय देशमुख यांच्यासह महाडमधील पदाधिकारी उपस्थित होते.
वार ठाकरे सेनेवर... चाल गोगावलेंवर?
रायगडच्या राजकारणात सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांच्यातील राजकीय संघर्ष अनेकदा चर्चेत राहिला आहे. स्थानिक पातळीवरील वर्चस्वाच्या मुद्द्यावरून संघर्षाची चर्चा होत असते. तसेच महाडमध्ये ओझर्डे आणि गोगावले यांच्यातील राजकीय विरोध सर्वश्रुत आहे. त्यामुळे ठाकरे गटातून राष्ट्रवादीत आलेल्या ओझर्डेंच्या माध्यमातून तटकरे गटाने महाडमध्ये गोगावले यांच्या राजकीय प्रभावाला आव्हान देण्याची रणनीती आखली आहे का? अशी चर्चा सुरु आहे.