अमेरिकन पर्यटकाची बॅग चोरट्याने केली लंपास;पनवेल नावडे येथील घटना

By Raigad Times    30-Aug-2026
Total Views |
panvel
 
पनवेल | अमेरिकेतून पर्यटनासाठी भारतात आलेल्या ४२ वर्षीय परदेशी पर्यटकाची सुमारे ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल असलेली बॅग पनवेल तालुक्यातील नावडे गावाजवळ चोरीला गेल्याची घटना घडली. या प्रकरणी तळोजा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
संबंधित पर्यटक पनवेल तालुक्यातील मोरबे गावाजवळील एका रिसॉर्टमध्ये वास्तव्यास होता. सोमवारी रात्री तो विलेपार्ले येथून टॅक्सीने रिसॉर्टकडे परतत होता. मुंब्रा महामार्गावर नावडे गावाजवळ आल्यानंतर त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्याने टॅक्सीचालकाला वाहन थांबविण्यास सांगितले.
 
टॅक्सीतून खाली उतरल्यानंतर तो पदपथावर बसला आणि टॅक्सीचालकाला पुढे जाण्यास सांगितले. यावेळी त्याने आपली बॅग पदपथावर ठेवली होती. काही वेळानंतर बॅग तेथे नसल्याचे त्याच्या लक्षात आले. बॅगेमध्ये मॅकबुक, आयपॅड, मोबाइल फोन यांसह इतर साहित्य होते. या सर्व मुद्देमालाची किंमत सुमारे ९० हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेप्रकरणी तळोजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, बॅग नेमकी कोणी आणि कोणत्या परिस्थितीत चोरली, याचा तपास सुरू आहे.