शिवसेना ठाकरे गटाचे सोमनाथ ओझर्डे राष्ट्रवादीच्या वाटेवर

By Raigad Times    30-Aug-2026
Total Views |
 mahad
 
महाड | महाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे विधानसभा समन्वयक तथा शिरगावचे सरपंच सोमनाथ दिगंबर ओझर्डे यांनी विधानसभा समन्वयकपदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
 
आपल्या पुढील राजकीय वाटचालीबाबत निर्णय घेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) पक्षात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे महाडच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. ओझर्डे यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नंदू शिर्के आणि संपर्कप्रमुख संजय कदम यांना पत्र देऊन आपल्या राजीनाम्याची माहिती दिली.
 
पक्षाने तसेच पक्षातील सहकार्‍यांनी राजकीय आणि सामाजिक वाटचालीत दिलेले प्रेम, मार्गदर्शन, सहकार्य आणि विश्वासाबद्दल त्यांनी पत्रातून आभार मानले आहेत. आपला निर्णय कोणत्याही व्यक्तीविषयी अथवा पक्षाविषयी नाराजी, द्वेष किंवा वैरभावनेतून घेतलेला नसून, जनतेच्या हिताचा आणि विकासाचा विचार करून पुढील राजकीय वाटचालीचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ओझर्डे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश करणार आहेत.
 
जनतेची कामे करणे, विकासकामांना चालना देणे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अधिक व्यापकपणे काम करणे, हे आपल्या पुढील राजकीय वाटचालीचे प्रमुख उद्दिष्ट राहणार असल्याचे ओझर्डे यांनी स्पष्ट केले. सोमनाथ ओझर्डे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातील प्रवेशाच्या निर्णयामुळे महाडच्या राजकारणात नव्या राजकीय समीकरणांना सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.