अलिबाग | पनवेल विधानसभा मतदारसंघातील मतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेतील, तब्बल ३ हजार ४०० गणना प्रपत्रे खारघर येथील एका झेरॉक्स सेंटरमध्ये आढळल्यामुळे रायगडात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच मतदान केंद्रस्तरीय अधिकार्यांना (बीएलओ) जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी निलंबीत करण्याचे आदेश दिले आहेत.
अर्ज झेरॉक्स करणारा भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.२७ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास खारघर सेक्टर १९ येथील एका झेरॉक्स सेंटरमध्ये निवडणूक आयोगाच्या अधिकृत गणना प्रपत्रांची अनधिकृतपणे झेरॉक्स काढली जात असल्याची बाब शिवसेना ठाकरे गटाच्या एका कार्यकर्त्याच्या निदर्शनास आले. त्यावेळी झेरॉक्स सेंटरवर ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यामध्ये झटापट झाली.
शिवसेना ठाकरे गटाचे खारघर विभागप्रमुख बालेश भोजने यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित झाला. त्यानंतर पक्षाचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, गटनेत्या लीना गरड, महानगरप्रमुख अॅड. समाधान काशीद यांच्यासह पदाधिकारी खारघर पोलीस ठाण्यात दाखल झाले. गुन्हा दाखल होईपर्यंत पोलीस ठाण्यातून न हलण्याची भूमिका पदाधिकार्यांनी घेतली. दुसरीकडे या प्रकरणाची दखल घेत सहाय्यक मतदार नोंदणी अधिकार्यांनी झेरॉक्स सेंटरवर धाव घेतली.
प्राथमिक चौकशीत मुर्बी गाव, खारघर येथील रहिवासी सूरज पाटील हा प्रपत्रांची झेरॉक्स काढत असल्याचे आढळून आला. यावेळी घटनास्थळी ३ हजार ४०० गणना प्रपत्रे मिळाली. ही प्रपत्रे पनवेल विधानसभा मतदारसंघातील ११ मतदान केंद्रांशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले. यापैकी पाच मतदान केंद्रांची १०० हून अधिक प्रपत्रे होती, तर अन्य सहा मतदान केंद्रांची प्रत्येकी एक प्रपत्र आढळून आले.
निवडणूक प्रक्रियेत मतदान केंद्रस्तरीय अधिकार्यांच्या ताब्यात सुरक्षित ठेवणे बंधनकारक असलेली ही संवेदनशील कागदपत्रे संबंधित अधिकार्यांच्या दप्तराबाहेर गेली कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रपत्रे ताब्यात ठेवणे तसेच त्यांची प्रत काढल्याप्रकरणी सूरज पाटील यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अॅड. समाधान काशीद यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झााला.
ज्या पाच मतदान केंद्रस्तरीय अधिकार्यांच्या दप्तरामधून मोठ्या संख्येने गणना प्रपत्रे बाहेर गेल्याचे प्राथमिक तपासात समोर आले, त्या बीएलओंना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. नियुक्ती प्राधिकारी तथा पनवेल महानगरपालिका आयुक्तांना संबंधित पाचही बीएलओंना तत्काळ निलंबित करुन त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत.
तसेच प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सखोल चौकशी करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (क्र. ३) नानासाहेब कामठे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, खारघरमधील प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मंत्री जयंत पाटील, खासदार वर्षा गायकवाड, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत एसआयआर प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित केले. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दिपक निकम यांनीही संपूर्ण पनवेल विधानसभा मतदारसंघातील एसआयआर प्रक्रियेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.