महाड एमआयडीसीच्या प्रवेशद्वारावर खड्डेच खड्डे , मुख्य रस्ता चकाचक; मात्र २०० मीटरचा पट्टा दुर्लक्षित, कामगारांचा संताप

By Raigad Times    30-Aug-2026
Total Views |
mahad
 
महाड | रायगड जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक वसाहतींपैकी एक असलेल्या महाड एमआयडीसीच्या प्रवेशद्वाराजवळील रस्त्याची अवस्था सध्या अत्यंत बिकट झाली आहे. एमआयडीसीच्या मुख्य रस्त्याचे काम जवळपास पूर्णत्वास आले असतानाही प्रवेशद्वाराजवळील सुमारे १०० ते २०० मीटरचा रस्ता मात्र मोठमोठ्या खड्ड्यांनी व्यापलेला आहे.
 
त्यामुळे या मार्गावरून दररोज प्रवास करणार्‍या हजारो कामगारांसह वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अधिक कारखाने असून या कारखान्यांमध्ये मोठ्या संख्येने कामगार कार्यरत आहेत. औद्योगिक वसाहतीत दररोज दुचाकी, चारचाकी, बस तसेच अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते.
 
अशा वर्दळीच्या मार्गावर प्रवेशद्वाराजवळील रस्त्याची झालेली दुरवस्था अपघाताला आमंत्रण देणारी ठरत असल्याची भावना कामगार आणि वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे.रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून पावसामुळे त्यामध्ये पाणी साचत आहे. त्यामुळे खड्ड्यांची खोली वाहनचालकांच्या लक्षात येत नसल्याने विशेषतः दुचाकीस्वारांना मोठा धोका निर्माण झाला आहे.
 
खड्डे चुकविताना वाहनांचे संतुलन बिघडून छोटे-मोठे अपघात होत असल्याच्या तक्रारीही कामगारांकडून करण्यात आल्या आहेत. अवजड वाहनांनाही या खड्ड्यांचा फटका बसत असून वाहनांचे टायर, सस्पेन्शन तसेच इतर भागांचे नुकसान होत असल्याचे सांगण्यात येत आहे.विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांत पावसाचा जोर कमी झाला असतानाही या रस्त्याची तातडीने डागडुजी करण्यात आलेली नाही.
 
मुख्य रस्त्याचे काम जवळपास पूर्ण झाले असताना प्रवेशद्वाराजवळील केवळ १०० ते २०० मीटरचा पट्टा का दुर्लक्षित ठेवण्यात आला आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. या संदर्भात एमआयडीसीचे अभियंता पाटेकर यांच्याशी संपर्क साधला असता, पावसाळ्यानंतर हे काम पूर्ण केले जाईल, असे त्यांनी सांगितले. मात्र, पावसाचा जोर कमी झालेला असताना तात्पुरती डागडुजी करून मार्ग वाहतुकीस सुरक्षित का केला जात नाही, असा प्रश्न कामगारांकडून विचारला जात आहे.
 
दररोज हजारो कामगार या रस्त्याचा वापर करीत असल्याने प्रशासनाने एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता तातडीने खड्डे बुजवावेत, अशी मागणी जोर धरत आहे. या दोन महिन्यांच्या कालावधीत एखादा मोठा अपघात होऊन जीवितहानी झाली तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा संतप्त सवाल कामगारांकडून उपस्थित केला जात आहे.महाड एमआयडीसीच्या प्रवेशद्वारासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी रस्त्याची अशी अवस्था राहणे ही औद्योगिक वसाहतीच्या दृष्टीने गंभीर बाब असल्याने संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी कामगार व वाहनचालकांकडून होत आहे.
 
महाड एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग सुरू असून परिसरातील आर्थिक व्यवहार आणि रोजगारासाठी या औद्योगिक वसाहतीचे महत्त्व मोठे आहे. मात्र, प्रवेशद्वारासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी रस्त्याची अशी अवस्था असल्याने उद्योगांमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दररोजच्या वाहतुकीमुळे खड्ड्यांची समस्या आणखी गंभीर होण्याची शयता आहे.
 
रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्यास फारसा वेळ लागत नसताना प्रशासनाकडून पावसाळ्यानंतर काम करण्याचे ओशासन दिले जात असल्याने कामगारांमध्ये नाराजी आहे. संबंधित विभागाने तातडीने खड्डे बुजवून वाहतूक सुरळीत करावी आणि रस्त्याच्या गुणवत्तेची नियमित पाहणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.