रायगडातील ३७ नागरिक परतीच्या मार्गावर;चीनमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु

सागा येथे सुरक्षित मुक्काम; २९ ऑगस्टला विमानाने मायदेशी परतण्याचे नियोजन

By Raigad Times    30-Aug-2026
Total Views |
mumbai
 
मुंबई | नेपाळमधील पूरस्थिती आणि काही मार्ग बंद झाल्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटनासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यासाठी राज्य प्रशासनाने केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत.
 
रायगडसह विविध जिल्ह्यांतील नागरिकांशी प्रशासन सातत्याने संपर्कात असून, उपलब्ध पर्यायी मार्गांचा वापर करून त्यांच्या सुरक्षित परतीची व्यवस्था केली जात आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून नेपाळला गेलेल्या ४५ जणांच्या गटामध्ये अहिल्यानगरमधील २७, नाशिकमधील १२, पुण्यातील ५ आणि मुंबईतील एका नागरिकाचा समावेश आहे.
 
हा गट सध्या चितवन येथे सुरक्षित असून, लुंबिनीमार्गे पुढील प्रवास करण्याचे नियोजन आहे. लुंबिनी येथे मुक्काम केल्यानंतर अयोध्येकडे रवाना होण्याचे नियोजन असल्याची माहिती टूर ऑपरेटर दर्शन गुंजाळ यांनी दिली. निर्मलाताई गुंजाळ यांच्या नेतृत्वाखालील या गटातील सर्व नागरिक सुरक्षित असून, काठमांडूकडे जाणारे मार्ग सध्या बंद असल्याने पर्यायी मार्गाचा अवलंब करण्यात येत आहे. परिस्थितीचा विचार करून त्यांना आवश्यक ती शासकीय मदत मिळावी, यासाठी प्रशासनाकडून समन्वय साधला जात आहे.
रायगडमधील ३७ जण सुरक्षित
रायगड जिल्ह्यातील जय गिरनारी शिवदत्त मंदिर ट्रस्टच्यावतीने दर्शन आणि पर्यटनासाठी नेपाळला गेलेले ३७ नागरिक सध्या सागा (चीन) येथे सुरक्षित आहेत. काठमांडूहून २९ ऑगस्ट रोजी भारतात परतण्यासाठी त्यांचे विमानाचे आरक्षण आहे. काठमांडूकडे जाणारे मार्ग अडचणीचे झाल्याने हे सर्व नागरिक पर्यायी मार्गाने आज सकाळी रवाना झाले असून, सायंकाळपर्यंत काठमांडू विमानतळावर पोहोचण्याचे नियोजन आहे.
 
त्यानंतर २९ ऑगस्ट रोजी ते भारतात परतणार असल्याची माहिती नातेवाईक दिलीप शेठ यांनी दिली. सर्वांची प्रकृती ठीक असून, या गटात दोन डॉक्टरांचाही समावेश आहे. नागपूर जिल्ह्यातील सर्व १०६ नागरिक सुरक्षित असून,जिल्हा प्रशासन त्यांच्याशी सातत्याने संपर्कात आहे. त्यांच्या परतीच्या प्रवासासाठी आवश्यक समन्वय आणि देखरेख केली जात आहे. यापैकी चार नागरिक विमानाने दिल्ली येथे सुखरूप पोहोचले आहेत, तर उर्वरित १०२ नागरिक बसमार्गे भारतात दाखल झाले आहेत.
 
सध्या हे १०२ नागरिक बिहारमधील सीतामढी जिल्ह्यात असून, आज रात्री ते पाटणा येथे पोहोचून मुक्काम करणार आहेत. त्यानंतर २९ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता रेल्वेने पाटणाहून नागपूरकडे रवाना होणार आहेत.
नागरिकांसाठी हेल्पलाईन;माहिती नोंदविण्याचे आवाहन
नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांची माहिती संकलित करून त्यांना तातडीने आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी
https://geospatial. mahaseoc.in/Sahayata_gulf/ या लिंकवर आपली किंवा अडकलेल्या नातेवाईकांची माहिती नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. नेपाळमधील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने २४ तास नियंत्रण कक्ष सुरू केला असून, अडचणीत असलेल्या नागरिकांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी १०७० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.