कर्जत | कर्जत तालुक्यातील सोलनपाडा डॅम परिसरात पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या मुंबईतील २४ वर्षीय तरुणाचा सांडव्यातील पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने पाण्यात वाहून जाऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (२ ऑगस्ट) दुपारी घडली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होतआहे.
अरमान अब्दुल लतीफ (वय २४) हा आपल्या तीन मित्रांसह मुंबईतील वडाळा येथून सोलनपाडा डॅम परिसरात आला होता. चौघेही डॅमच्या सांडव्यातून वाहणार्या पाण्याच्या खालच्या बाजूस पाण्यात उतरून आनंद घेत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला.
अरमान हा पाण्याच्या वेगवान प्रवाहात वाहून गेला. दुपारी सुमारे अडिच वाजण्याच्या सुमारास अरमानचा मृतदेह आढळून आला. त्याला कशेळे ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.