खालापूर | "विकासाच्या नावाखाली पेण, अलिबाग आणि रोहा परिसरातील भूमिपुत्रांना त्यांच्या जमिनींपासून दूर करण्याचा कोणताही प्रयत्न शेतकरी कामगार पक्ष हाणून पाडेल. स्थानिकांच्या जमिनी, रोजगार आणि अस्तित्वावर घाला घालणार्या प्रत्येक निर्णयाविरोधात आम्ही रस्त्यावर उतरुन संघर्ष करु.
भूमिपुत्रांच्या हक्कांशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस तथा माजी आमदार जयंत पाटील यांनी सरकारला दिला. खालापूर येथे पार पडलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या ७९ व्या वर्धापन दिन सोहळ्यात जयंत पाटील यांनी पक्षाच्या आगामी राजकीय वाटचालीचा आराखडा मांडत ही सभा शेकापच्या राजकीय पुनरागमनाची रणघोषणा असल्याचे घोषित केले.
तिसर्या महामुंबई प्रकल्पासह स्मार्ट मीटर योजनेवर त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. "जनतेवर लादलेली स्मार्ट मीटरची सक्ती आम्ही सहन करणार नाही. वीज ग्राहकांची आर्थिक लूट थांबविण्यासाठी शेकाप रस्त्यावर उतरून स्मार्ट मीटरची होळी करेल आणि लाखोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढून सरकारला हा निर्णय मागे घ्यायला भाग पाडेल,” असा इशाराही त्यांनी दिला.
राजकीय पुनरागमनाचा निर्धार व्यक्त करत जयंत पाटील म्हणाले, "अपयश हा शेवट नसून नव्या संघर्षाची सुरुवात आहे. युवकांच्या बळावर शेतकरी कामगार पक्ष पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात दमदार पुनरागमन करेल आणि २०२९ च्या परिवर्तनाच्या लढ्यात निर्णायक शक्ती म्हणून उभा राहील.” संघटनात्मक पुनर्बांधणीवर भर देताना त्यांनी प्रत्येक गाव आणि शहरात पक्ष अधिक सक्षम करण्याची घोषणा केली.
युवकांना नेतृत्वाच्या केंद्रस्थानी आणून जनतेच्या प्रश्नांवरील संघर्ष अधिक तीव्र केला जाईल, असे सांगत "शेकापची ताकद आमदार- खासदारांच्या संख्येत नसून जनतेच्या विश्वासात आणि संघर्षाच्या परंपरेत आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी युवक मोठ्या प्रमाणावर एकत्र येत असल्याचा दावा केला.
दिल्लीतील जंतरमंतरवरील विद्यार्थी आंदोलनाचा संदर्भ देत युवकच परिवर्तनाचे नेतृत्व करतील, असा विश्वास व्यक्त करत राज्यात महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडी यांच्या माध्यमातून २०२९ मध्ये परिवर्तन घडविण्यासाठी कार्यकर्त्याने आतापासून जनतेमध्ये उतरावे, असे आवाहन त्यांनी केले. या सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार, शेकापच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्षा अॅड. मानसी म्हात्रे, युवा नेत्या अॅड.सौम्या कोरडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.