अलिबाग | रायगडचे खासदार,राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे हे तसे संयमी नेते म्हणून ओळखले जातात. मात्र शनिवारी महसूल दिनाच्या कार्यक्रमात त्यांचा पारा असा काय चढला की, सर्वांसमोर व्यासपीठावरच त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांना सुनावले. एरव्ही त्यांच्या भाषणातील कोट्या आवडीचा विषय ठरतो; मात्र यावेळी तटकरे यांनी केलेल्या शाब्दीक कोट्या मित्रपक्षांतील आमदारांच्या जिव्हारी लागल्या.
इतकेच नाही, महसूल मंत्री यांनी मागितलेली माफी भाजपच्या कार्यकर्त्यांना आवडली नसल्याची चर्चा आहे.शनिवारी, १ ऑगस्ट रोजी अलिबाग येथे महसूल दिनाचा शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे स्वतः या कार्यक्रमानिमित्ताने उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमाचे निमंत्रण देताना ‘राजशिष्टाचार’ पाळला गेला नाही, यावरुन रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी नाराजी व्यक्त केली.
यानंतर मनोगत व्यक्त करताना त्यांनी, महसूल विभागाचे सामान्य माणसाच्या जीवनातील महत्त्व मोठे असल्याचे त्यांनी सांगितले. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यक्षमतेचेही कौतुक केले. मात्र भाषणाची सुरुवात करताना खा.तटकरे यांनी, शिवसेनेचे नेते, मंत्री भरत गोगावले यांचा उल्लेख "गरीबांचे शेठ” असा केला. गरीबांचे शेठ असे म्हणताना त्यांनी दोनदा उच्चार करुन तसे अधोरेखित केले.
यानंतर अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांचा "महा दमदार” असा मिश्किल उल्लेख केला. आ.दळवी यांचे कार्यकर्ते त्यांच्या नावासमोर ‘दमदार आमदार’ असे विशेषण लावतात, खा.तटकरे यांनी दमदारच्या आधी ‘महा’ असा केलेला उल्लेख शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना फारसा आवडला नाही. तर पेणचे भाजपचे आमदार रविंद्र पाटील यांचे नाव घेताना "नेहमीच कार्यक्रमांना उशिरा येणारे ज्येष्ठ आमदार” अशी टिपणी तटकरे यांनी केली.
खा.सुनील तटकरे यांनी केलेल्या मिश्किल टिपण्यांनी उपस्थितांमध्ये खसखस पिकली. मात्र शिवसेना आणि भाजप आमदारांच्या कार्यकर्त्यांना ते फारसे रुचले नसल्याचे दिसून आले. मंत्री भरत गोगावले यांनी तसे बोलूनही दाखवले. "शेठ गरीबांचे बना, श्रीमंताचे शेठ कधी बनू नका” याची आठवण त्यांनी करुन दिली. तर अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी तर खरमरीत टिका केली आहे. चांगल्या कार्यक्रमात व्यत्यय आणणे आणि प्रशासनावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणे ही तटकरे कुटुंबाची जुनी सवय आहे.
रोहा, श्रीवर्धनमध्ये कार्यक्रम असेल तेव्हा त्यांची भूमिका वेगळी असते; पण इतर ठिकाणी ते राजशिष्टाचारासंदर्भात आक्रमक असतात, असे म्हणत आ.दळवी यांनी खा.सुनील तटकरे यांना सुनावले आहे. सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणात उपस्थित लोकप्रतिनिधींची वैशिष्ट्यपूर्ण शब्दांत ओळख करून देताना केलेल्या काही टिप्पणींमुळे कार्यक्रमात काही काळ अस्वस्थ वातावरण निर्माण झाले.
राजशिष्टाचारावरुन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तटकरेंची दिलगिरी व्यक्त केली. मात्र बावनकुळेंना स्वतःच्याच कार्यक्रमात व्यक्त करावी लागलेली दिलगिरी भाजप कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली. दरम्यान, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्यावरही तटकरेंची वक्रदृष्टी पडली. एका शासकीय कर्मचार्याची मनाविरुद्ध झालेली बदली आणि निधी वाटपावरुन, तटकरे यांनी भरल्या व्यासपीठावर वाकडीकर यांच्यावर आगपाखड केली. त्यामुळे महसूल दिनासारख्या शासकीय कार्यक्रमात झालेल्या या राजकीय शाब्दीक चकमकीची जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे.