महसूल प्रशासन लोकाभिमुख करा, कल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवा-महसूल मंत्री

By Raigad Times    03-Aug-2026
Total Views |
 ALIBAG
 
अलिबाग | महसूल प्रशासन अधिक गतिमान,पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी राज्य शासनाने अनेक ऐतिहासिक आणि नावीन्यपूर्ण निर्णय घेतले असून, त्यांची रायगड जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करून कल्याणकारी योजनांचा लाभ गोरगरीब आणि तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवावा, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
 
शनिवारी (१ ऑगस्ट) अलिबाग येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ आणि महसूल दिन कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार सुनील तटकरे, माजी खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आ.रविंद्र पाटील, तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, कृषी सभापती वैकुंठ पाटील, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, महसूल अपर आयुक्त वैशाली उंटवाल, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 
महिला सक्षमीकरणासाठी शेतात व उद्योगात कार्यरत महिलांना ‘शेतकरी सन्मान कार्ड’ देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. तसेच शेतपाणंद रस्त्यांचे सीमांकन करून त्यांची अधिकृत नोंदणी करण्याचे काम सुरू असल्याचे सांगत अलिबाग तालुक्यातील मुळे गावातील पाणंद रस्त्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती दिली. तुकडेबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, रहिवासी घरे कायदेशीर करण्याची प्रक्रिया, स्वामित्व आणि नकाशा योजनेद्वारे मोफत मोजणी, रेवसरेड्डी महामार्ग, तसेच वनहक्क कायद्यांतर्गत सुमारे ६० ते ६५ हजार आदिवासी बांधवांना ‘७ ई’ आणि ‘१२ ई’ सातबारा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 
खासदार सुनील तटकरे यांनी महसूल विभागाच्या कामकाजाचे कौतुक करत हा विभाग सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असल्याचे सांगितले. रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी कोकणातील शेतकरी हा स्वाभिमानी आणि कर्जाची नियमित परतफेड करणारा असल्याचे सांगत शासनाच्या महसूल अभियानाचे स्वागत केले. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचा पुढचा टप्पा म्हणून महाराजस्व अभियानाची प्रशंसा करत प्रत्येक पंचायत समिती गणापर्यंत योजना पोहोचविण्याचे आवाहन केले. आमदार महेंद्र दळवी आणि विक्रांत पाटील यांनी सर्वसामान्य नागरिकांना एकाच ठिकाणी शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण असल्याचे मत व्यक्त केले.