भाजपला रामराम , कर्जत येथील भाजप नेते राजेश लाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

By Raigad Times    03-Aug-2026
Total Views |
karjat
 
कर्जत | कर्जत शहर भाजप मंडळाचे अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर माजी नगराध्यक्ष राजेश लाड यांनी अवघ्या चार दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. माजी आमदार आणि भाजप प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य सुरेश लाड यांचे पुतणे राजेश लाड यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
 
पक्षाचे नेते, खासदार सुनील तटकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. भाजपमध्ये निर्णय घेण्याची अधिकार नसल्याने नाराजी व्यक्त करीत राजेश लाड यांनी कर्जत शहर मंडळ अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर त्यांनी भाजपला राम राम करीत रविवारी (२ ऑगस्ट) राष्ट्रवादीत (अजित पवार गट) प्रवेश केला आहे.
 
खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत सुतारवाडी येथील पक्ष कार्यालयात झालेल्या या प्रवेशामुळे कर्जतच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राजेश लाड हे माजी आमदार सुरेश लाड यांचे पुतणे असून कर्जत नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे.
 
कर्जत नगरपरिषदेत नगराध्यक्ष म्हणून कार्य करणारे राजेश लाड यांची कार्यकर्ता म्हणून चांगली प्रतिमा आहे. मात्र भाजपात काही कार्यकर्ते आपल्याला ब्रेक लावण्याचे काम करीत होते आणि त्यामुळे आपला राजीनामा दिल्याची खदखद त्यांनी व्यक्त केली होती. राजेश लाड यांच्या प्रवेशावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे, जेष्ठ नेते पुंडलिक पाटील, जिल्हा प्रवक्ते भरत भागात, जिल्हा सरचिटणीस एकनाथ धुळे, कर्जतच्या नगराध्यक्ष पुष्पा दगडे आदी उपस्थित होते.