उमाजी म. केळुसकर | ज्येष्ठ पत्रकार |रायगड जिल्ह्यात मोकाट गुरांचा प्रश्न आता केवळ वाहतुकीला अडथळा निर्माण करण्यापुरता उरलेला नसून, तो नागरिकांच्या जिवावर बेतणारा एक अत्यंत भीषण आणि गंभीर विषय बनला आहे. उरण शहर आणि द्रोणागिरी परिसरात घडलेली नुकतीच घटना या विदारक वास्तवतेची भीषण साक्ष देते.
रस्त्यावरून आपल्या पत्नीसोबत स्कुटीने जाणार्या ५५ वर्षीय हॉटेल व्यावसायिक महेंद्र झामनदास सहतिया यांना एका मोकाट बैलाने मारलेल्या धडकेत आपला जीव गमवावा लागला, तर त्यांची पत्नी रेणू सहतिया या गंभीर जखमी झाल्या. २४ ऑगस्टच्या रात्री घडलेल्या या भीषण अपघाताने संपूर्ण उरण आणि द्रोणागिरी परिसर हळहळला आहे. परंतु, अशा घटना घडल्यानंतर स्थानिक प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना खरोखरच जाग येते का, हा मुख्य प्रश्न आहे.
अशा दुर्दैवी घटना केवळ अपघाताची नोंद करून विसरून जाण्यासारख्या नसून प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षाचा बळी ठरणार्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा हा थेट प्रश्न आहे. गेल्या काही वर्षांत रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, प्रमुख रस्ते आणि गावांतील, शहरातील रस्ते, चौक यांवर मोकाट फिरणार्या जनावरांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. दिवसाढवळ्या रस्त्याच्या मध्यभागी ठाण मांडून बसलेली गुरे, आपापसांत भिडणारे बैल आणि अचानक वाहनांसमोर येणारी जनावरे यामुळे दररोज कुठे ना कुठेछोटे-मोठे अपघात होत आहेत.
महामार्गावरून सुसाट धावणार्या वाहनांच्या चालकांना अंधारात किंवा वळणावर ही जनावरे वेळेत दिसत नाहीत, ज्यामुळे भीषण अपघात घडतात. अनेकदा ही जनावरे रस्त्यावरील कचरा, प्लास्टिक आणि उघड्यावर टाकलेले अन्न खाण्यासाठी रस्त्यावर येतात. शेतकर्यांनी आणि पशुपालकांनी दुध किंवा शेतीचे काम संपल्यानंतर या गुरांना वार्यावर सोडून देण्याची वृत्ती जोपासली आहे.
जेव्हा गुरे म्हातारी होतात किंवा निरुपयोगी ठरतात, तेव्हा त्यांना थेट रस्त्यावर मोकाट सोडून दिले जाते. या बेजबाबदार पशुपालकांवर कठोर कारवाई करण्याची कोणतीही यंत्रणा सध्यातरी कार्यरत असल्याचे दिसत नाही. नागरिकांनी भरलेल्या करातून प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींचे वेतन चालते, तरीही नागरिकांच्या मूलभूत सुरक्षेचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर टांगलेला राहतो.
रस्त्यांवरून सुखरूप घरी परतणे हा प्रत्येक करदात्याचा घटनात्मक हक्क आहे, परंतु आज रायगडमधील रस्ते हे मृत्युचे सापळे बनले आहेत. मोकाट जनावरांच्या दहशतीमुळे रात्रीच्या वेळी दुचाकीवरून प्रवास करणे म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालण्यासारखेच झाले आहे. केवळ अपघात घडल्यानंतर हळहळ व्यक्त करून किंवा चौकशीचे औपचारिक आदेश देऊन लोकप्रतिनिधी आपले हात वर करतात.
दुर्दैवाने, या संकटावर दीर्घकालीन उपाययोजना आखण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीचा पूर्णपणे अभाव दिसून येत आहे. जर स्थानिक प्रशासनाने वेळीच योग्य पावले उचलली नाहीत, तर हा असंतोष रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. या सर्व प्रकारात सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे स्थानिक प्रशासनाचा. जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपरिषदा आणि ग्रामपंचायतींच्या हद्दीत असणारे कोंडवाडे (कांजूर/ ) आता कागदावरच उरले आहेत किंवा पूर्णपणे गायब झाले आहेत.
पूर्वीच्या काळात रस्त्यावर मोकाट फिरणारी गुरे पकडून या कोंडवाड्यात टाकली जात असत. त्यांच्या मालकांकडून जबर दंड वसूल केला जायचा आणि पुन्हा असे न करण्याची ताकीद दिली जात असे. यामुळे पशुपालक आपल्या गुरांना मोकाट सोडण्यास घाबरत असत. परंतु, आजच्या घडीला रायगड जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायती आणि नगरपालिकांचे कोंडवाडे धूळ खात पडून आहेत किंवा त्यांची दारे कायमची बंद झाली आहेत.
कित्येक ठिकाणी कोंडवाड्याच्या जागांवर अतिक्रमणे झाली आहेत, तर काही ठिकाणी प्रशासनाने ही व्यवस्थाच बासनात गुंडाळून ठेवली आहे. प्रशासकीय उदासीनतेचा हा कळस आहे. मोकाट गुरांना पकडण्यासाठी ना योग्य कर्मचार्यांची नियुक्ती केली जाते, ना त्यांच्यासाठी आवश्यक वाहने उपलब्ध आहेत. जेव्हा एखादी मोठी दुर्घटना घडते, एखाद्या नागरिकाचा जीव जातो, तेव्हा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली जाते.
काही दिवस स्थानिक नागरिक संताप व्यक्त करतात, वृत्तपत्रांत बातम्या छापून येतात आणि त्यानंतर पुन्हा सर्व काही सुरळीत सुरू राहते. महेंद्र सहतिया यांच्यासारख्या निष्पाप नागरिकाचा जीव गेल्यानंतर उरण पोलीस ठाण्यात केवल अकस्मात मृत्यू म्हणून या घटनेची नोंद झाली. पण खर्या अर्थाने या मृत्यूला जबाबदार कोण? रस्त्यावर मोकाट बैल सोडणारा तो अज्ञात मालक की या गुरांचा बंदोबस्त न करणारे स्थानिक नगरपालिका आणि ग्रामपंचायत प्रशासन? जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची नितांत गरज आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक नगरपालिका आणि ग्रामपंचायत हद्दीत बंद पडलेले कोंडवाडे तात्काळ पुनरुज्जीवित केले पाहिजेत. मोकाट गुरांना पकडण्यासाठी विशेष मोहिमा राबवून त्यांना या कोंडवाड्यात किंवा नोंदणीकृत गोशाळांमध्ये हलवण्यात यावे. त्याचप्रमाणे, आपल्या गुरांना मोकाट सोडणार्या पशुपालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर केवळ दंडात्मकच नव्हे, तर गुन्हेगारी स्वरूपाची कारवाई केली पाहिजे.
जनावरांच्या टॅगिंग () पद्धतीचा कडक वापर करून रस्त्यावर आढळणार्या गुरांच्या मालकाची ओळख पटवणे कठीण नाही. याशिवाय, प्रत्येक तालुक्यात एक विशेष आपत्कालीन हेल्पलाइन सुरू करावी, जिथे नागरिक रस्त्यावरील मोकाट जनावरांची माहिती लगेच देऊ शकतील. प्रशासनाने यावर तात्काळ कार्यवाही केली नाही, तर भविष्यात आणखी किती निष्पाप नागरिकांचे नाहक बळी जातील, हा प्रश्न अनुत्तरितच राहील.
सार्वजनिक रस्ते हे नागरिकांच्या सुरक्षित प्रवासासाठी असतात, मोकाट जनावरांचा अड्डा बनण्यासाठी नाहीत. उरणमधील घटनेने संपूर्ण रायगड जिल्ह्याला एक धोक्याचा इशारा दिला आहे. जर प्रशासनाने आताही डोळे उघडले नाहीत आणि गायब झालेले कोंडवाडे पुन्हा सुरू करून कडक धोरण अवलंबले नाही, तर दररोज असेच निष्पाप नागरिक आपले प्राण गमवत राहतील. आता पोकळ आश्वासने आणि अपघातांच्या नोंदी पुरे झाल्या; प्रशासनाने कृती करून मोकाट गुरांच्या या भीषण प्रश्नातून रायगडच्या नागरिकांची लवकरात लवकर मुक्तता करावी.