तळा | महागाव पंचक्रोशीतील विनवली फाटा ते कोरखंडा फाटा या रस्त्याची गेल्या काही वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने ग्रामस्थांसह विद्यार्थी, प्रवासी आणि वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्याची तातडीने दुरुस्ती न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.
या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रुप ग्रामपंचायत महागावच्या माध्यमातून मागील तीन वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभाग, माणगाव तसेच पंचायत समिती तळा यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र, अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विनवली, बहुलेवाडी, महागाव आदिवासीवाडी, बारपे, महुरे, कोरखंडा, म्हसाडी, कारवीने आदी गावांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे.
या मार्गावर इंदापूर-कोरखंडा एसटी बससेवाही सुरू आहे. मात्र, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेकदा वाहतूक विस्कळीत होते. खड्डे चुकवताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून किरकोळ अपघातांचे प्रमाणही वाढल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांना उपचारासाठी नेताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गणेशोत्सवाच्या पोर्शभूमीवर चाकरमानी मोठ्या संख्येने गावाकडे येणार असल्याने रस्त्याची अवस्था आणखी गंभीर ठरण्याची शयता व्यक्त होत आहे.
दरम्यान, २४ ऑगस्ट रोजी ग्रुप ग्रामपंचायत महागाव येथे प्रशासक पुष्पा नेरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत रस्त्याच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात धरणे आंदोलन करण्याचा एकमुखी ठराव करण्यात आला. येत्या आठ दिवसांत रस्त्याची दुरुस्ती करून खड्डे न भरल्यास ‘खड्डे भरणे आंदोलन’ करण्यात येईल आणि मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणार्या या भागातील रस्त्याच्या प्रश्नाकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी लक्ष देणार का, असा सवालही ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.