अलिबाग | गणेशोत्सवासाठी कोकणात मोठ्या संख्येने दाखल होणार्या चाकरमान्यांच्या स्वागतासाठी रायगड जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. गणेशभक्त आणि प्रवाशांना प्रवासादरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी वीज, पाणी, वाहतूक, सुरक्षा आणि आपत्कालीन मदतीचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.
तसेच मुंबई-महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी व्यवस्था सक्षम ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री भरत गोगावले यांनी प्रशासनाला दिले. गुरुवारी (२८ ऑगस्ट) जिल्हा नियोजन भवन सभागृहात गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आयोजित शांतता समितीच्या बैठकीत पालकमंत्री गोगावले बोलत होते.
या बैठकीस महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, जिल्हाधिकारी किशन जावळे, आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर पनवेलचे आयुक्त मंगेश चितळे, जल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, जिल्हा नियोजन अधिकारी उमेश सूर्यवंशी, चंद्रसेन पवार आदी उपस्थित होते. शांतता समितीच्या सदस्यांनी सुरुवातीला आपापल्या भागातील प्रश्न मांडून जिल्हाप्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.
यांनंतर पालकमंत्री भरत गोगावले यांनी, गणेशोत्सव काळात नागरिकांना पुरेशा प्रमाणात वीज आणि मुबलक पाणी उपलब्ध करून देण्याबरोबरच वाहतूक व सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना पूर्ण ठेवाव्यात. गणेशोत्सव, दहीहंडी आणि त्यानंतरचा नवरात्रोत्सव सुरळीत पार पडण्यासाठी सर्व विभागांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, अशा सूचना प्रशासनाला दिल्या.
महामार्गावर विशेष यंत्रणा
गणेशोत्सवासाठी कोकणात येणार्या चाकरमान्यांची संख्या मोठी असल्याने मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यावर प्रशासनाने विशेष भर दिला आहे. इंदापूर, माणगाव, लोणेरे, पोलादपूर आदी भागातील पर्यायी मार्गांची माहिती प्रवाशांना मिळावी, यासाठी योग्य ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्याच्या सूचना दिल्या आहेत.
वाहन बिघाडामुळे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी महामार्गावर २० टोईंग क्रेन आणि २० रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात येणार आहेत. तसेच २५ मोटारसायकलींच्या माध्यमातून वाहतूक व्यवस्थेवर लक्ष ठेवले जाणार आहे. प्रवाशांसाठी आवश्यक ठिकाणी पाणी आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.
महामार्गावर दहा सुविधा केंद्रे
गणेशभक्त आणि प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई-गोवा महामार्गावर खारपाडा, खारेपाटण, वाकण, कोलाड, इंदापूर, माणगाव, लोणेरे, महाड, महाड एमआयडीसी आणि पोलादपूर येथे सुविधा केंद्रे उभारण्यात येणार आहेत. या केंद्रांवर पिण्याचे पाणी, वैद्यकीय कक्ष, पोलीस मदत कक्ष, महिला व बालकांसाठी आवश्यक सुविधा, वाहन विश्रांतीची व्यवस्था तसेच टायरमध्ये हवा भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
पोलीस व होमगार्डचा बंदोबस्त
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ७ पोलीस उपनिरीक्षक, १२८ पोलीस अधिकारी, १ हजार ९०० पोलीस अंमलदार, ४०० होमगार्ड आणि एसआरपीएफची एक कंपनी तैनात करण्यात येणार आहे. आतापर्यंत ३६ शांतता समिती बैठका, ३० मोहल्ला समिती बैठका, १३७ गणेश मंडळांच्या बैठका आणि १२५ गाव बैठका घेण्यात आल्या आहेत.