कर्जतमध्ये अंमली पदार्थ तस्करीप्रकरणी नायजेरियन अटकेत

हालिवलीतील इमारतीवर पुणे पोलिसांच्या नार्कोटीक्स पथकाची धाड

By Raigad Times    28-Aug-2026
Total Views |
 karjat
 
कर्जत | कर्जत नगरपरिषद हद्दीला लागून असलेल्या हालिवली गावातील सिग्नेचर डिझायर इमारतीत अंमली पदार्थांची तस्करी केल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी नार्कोटीक्स पथक आणि रायगड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत नायजेरियन जोडप्याला ताब्यात घेतले आहे.
 
या प्रकरणात एका स्थानिक युवकाचा सहभाग असल्याचा संशय असून, त्यादृष्टीनेही तपास सुरू आहे. संबंधित नायजेरियन जोडपे गेल्या वर्षभरापासून हलीवली येथील सिग्नेचर डिझायर इमारतीत वास्तव्यास होते. त्यापैकी एक जण दररोज रात्री कर्जत ते पुणे असा प्रवास करत होता.
 
त्याचा हा नियमित प्रवास संशयास्पद वाटल्याने पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी नार्कोटीक पथकाने काही दिवसांपासून त्याच्यावर पाळत ठेवली होती. या तपासाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी पुणे पोलिसांच्या नार्कोटीक पथकाने रायगड पोलिसांच्या मदतीने सिग्नेचर डिझायर इमारतीतील बी विंगमधील फ्लॅट क्रमांक १०२ वर धाड टाकली. संयुक्त कारवाईदरम्यान फ्लॅटमधून संशयित अंमली पदार्थ तसेच तस्करीशी संबंधित महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, या कारवाईबाबत पोलिसांनी अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.