माणगाव बायपासचा मुहूर्त हुकणार, घोषणा हवेतच;पालकमंत्री भरत गोगावले म्हणतात, ‘आणखी थोडे दिवस थांबा...’

By Raigad Times    28-Aug-2026
Total Views |
mangoan news
 
माणगाव | मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव बायपासची एक बाजू गणेशोत्सवापासून सुरु करण्याची मंत्र्यांनी केलेली घोषणा हवेत विरण्याची शक्यता आहे. गणेशोत्सव अवघ्या १५ दिवसांवर येऊन ठेपला असून, चाकरमान्यांनी कोकणात जाण्याची तयारी सुरु केली आहे.
 
मात्र, महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि अपूर्ण कामांमुळे यंदाही गाव गाठण्यासाठी त्यांना वाहतूक कोंडीचे दिव्य पार करावे लागण्याची चिन्हे आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी माणगाव बायपासची एक बाजू गणेशोत्सवापूर्वी वाहतुकीसाठी खुली करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर खासदारांसह मंत्र्यांनी दावा केला होता. रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी तर माणगाव बायपाससाठी आणखी काही दिवस थांबावे लागेल, असे म्हटले आहे.
 
mangoan news
 
पुलाला रेल्वे क्रॉसिंग असल्याने रेल्वेच्या मंजुरीचा तांत्रिक मुद्दा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा, यासाठी पालकमंत्री भरत गोगावले यांनी गुरुवारी (२७ ऑगस्ट) पनवेल-पळस्पेपासून माणगावपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. महामार्गावरील खड्डे आणि इतर अडचणी तातडीने दूर करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.
 
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावतो आणि त्याचा परिणाम पुढील मार्गावरील वाहतुकीवर होऊन कोंडी निर्माण होते. त्यामुळे खड्डे तसेच रस्त्याशी संबंधित अन्य अडचणी तातडीने दूर करून वाहतूक सुरळीत ठेवावी, असे निर्देश त्यांनी दिले. गणेशोत्सवात मुंबई, नवी मुंबई आणि उपनगरांतून मोठ्या संख्येने चाकरमानी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गकडे रवाना होतात. त्यामुळे यंदा महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.
 
प्रत्येक अडचणीच्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना करून वाहतूक कोंडी होणार नाही, यासाठी प्रशासनाने सज्ज रहावे, असे गोगावले यांनी सांगितले. या पाहणी दौर्‍यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आंचल दलाल, प्रांताधिकारी प्रवीण पवार तसेच राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्ह्यातील संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. गणेशोत्सवासाठी कोकणाकडे निघालेल्या चाकरमान्यांना यंदाही माणगाव आणि इंदापुर शहरात होणारी वाहतूक कोंडी फोडून गाव गाठावे लागणार आहे.