उरण | भारताच्या सागरी व्यापार क्षेत्रासाठी अभिमानास्पद कामगिरी करत जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाने (जेएनपीए) जागतिक कंटेनर बंदरांच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. अल्फालायनरच्या २०२६च्या पहिल्या सहामाहीतील जगातील प्रमुख ३० कंटेनर बंदरांच्या क्रमवारीत जेएनपीएने तब्बल सात स्थानांची सुधारणा करत २८ व्या स्थानावरून थेट २१ वे स्थान पटकावले आहे.
मागील वर्षाच्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत कंटेनर हाताळणीत १३.६ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. जागतिक व्यापार आणि पुरवठा साखळीसमोर आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झालेली असतानाही जेएनपीएने मालवाहतुकीची गती आणि सातत्य कायम राखले.
कार्यक्षम माल हाताळणी, जलद मालवाहतूक व निर्गमन, जहाज हाताळणीतील सुधारणा तसेच बहुविध वाहतूक जोडणी सक्षम करण्यावर बंदर प्रशासनाने भर दिला. परिणामी जागतिक क्रमवारीत जेएनपीएच्या कामगिरीला मोठी झेप मिळाली. २०२६च्या पहिल्या सहामाहीत अमेरिका- इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जागतिक व्यापार आणि पुरवठा साखळीवर परिणाम झाला होता.
अशा प्रतिकूल परिस्थितीतही आयात- निर्यात मालाची वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी जेएनपीएकडून प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या. वाढलेल्या कार्यात्मक गरजांचे सक्षम व्यवस्थापन करत व्यापाराची गती आणि सातत्य कायम ठेवण्यात प्रशासनाला यश आले.
जेएनपीएचे अध्यक्ष गौरव दयाल यांनी या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले. जागतिक क्रमवारीतील २१वे स्थान हे टर्मिनल ऑपरेटर्स, भागधारक आणि संपूर्ण बंदर समुदायाच्या सामूहिक कार्यक्षमतेचे प्रतिबिंब असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक व्यापारातील आव्हानांमध्येही विश्वासार्ह व कार्यक्षम माल हाताळणी सेवा देण्याची जेएनपीएची क्षमता अधिक बळकट झाली असून, आघाडीच्या कंटेनर बंदरांमध्ये स्थान आणखी उंचावण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
वाढवण बंदरामुळे क्षमतेला नवी दिशा
अल्फालायनर ही लाइनर शिपिंग क्षेत्रातील डेटा व व्यावसायिक माहिती सेवा देणारी जागतिक संस्था असून, कंटेनर हाताळणीच्या प्रमाणाच्या आधारे जगातील बंदरांचे मूल्यमापन करते. त्यामुळे जेएनपीएची सात स्थानांची सुधारणा ही भारताच्या वाढत्या सागरी व्यापार क्षमतेचे महत्त्वपूर्ण द्योतक मानली जात आहे.
२६ मे १९८९ रोजी स्थापना झालेल्या जेएनपीएने बल्क कार्गो टर्मिनलपासून देशातील प्रमुख कंटेनर बंदरापर्यंतचा प्रवास केला आहे. सध्या जेएनपीएअंतर्गत पाच कंटेनर टर्मिनल्स कार्यरत आहेत. सामान्य मालासाठी शॅलो वॉटर बर्थ, द्रव मालासाठी टर्मिनल्स आणि किनारी धक्क्याच्या माध्यमातून देशातील इतर बंदरांशी जोडणी वाढविण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, वाढवण येथे सर्व हवामानात कार्यरत राहणारे खोल पाण्याचे ग्रीनफिल्ड बंदर विकसित केले जात आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रासह देशाच्या सागरी व्यापार क्षमतेला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. जेएनपीएची ही सात स्थानांची झेप भारताच्या सागरी सामर्थ्याला जागतिक पातळीवर नवी ओळख देणारी ठरली असून, आता ‘टॉप २०’मध्ये प्रवेश करण्याचे लक्ष्य अधिक जवळ आले आहे.