अलिबाग | अनिकेत तटकरे हे सरोगसी बाळ आहेत. आम्ही फॉर्म काढला नसता, तर त्यांचा राजकीय जन्मच झाला नसता, असा जोरदार हल्लाबोल अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी केला आहे. रायगडात सध्या तटकरे आणि दळवी यांच्यात जोरदार वाक्युद्ध सुरू आहे.
आमदार महेंद्र दळवी यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आणि तटकरे कुटुंबीयांवर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना अनिकेत तटकरे यांनी दळवींवर तिखट शब्दांत पलटवार केला होता. तसेच, ‘पत्नीला जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळावे यासाठी दळवी तटकरेंकडे फेर्या मारत होते,’ असा आरोपही त्यांनी केला होता. गुरुवारी (२७ ऑगस्ट) आमदार महेंद्र दळवी यांनी पुन्हा एकदा अनिकेत तटकरे यांच्यावर निशाणा साधला.
विधानपरिषद निवडणुकीत आम्ही उमेदवारी अर्ज काढला नसता, तर अनिकेत तटकरेंचा राजकीय जन्मच झाला नसता, असे सांगत दळवी यांनी त्यांचा उल्लेख ‘सरोगसी बाळ’ असा केला. आमदार महेंद्र दळवी यांच्या या जहरी टीकेनंतर रायगडमध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा राजकीय वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. कर्जत येथे अनिकेत तटकरे यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्यावर टीका केली होती.
त्यानंतर गुरुवारी दळवींनी त्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधान परिषद मतदारसंघातून २०२६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड झाली होती. अखेरच्या क्षणी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुरेंद्र ऊर्फ बाळ माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे अनिकेत तटकरे यांचा बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा झाला.
शिवसेना शिंदे गटाच्या कोकणातील आमदारांनी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार सुनील तटकरे यांच्यात चर्चा झाल्यानंतर शिवसेनेकडून दाखल करण्यात आलेला उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला. त्यामुळे अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून गेले.