मुंबई | गणेशोत्सव आणि आगामी सणांच्या पोर्शभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) अन्नसुरक्षेबाबत कडक भूमिका घेतली आहे. पंचतारांकित हॉटेल असो, रस्त्यावरील खाद्यविक्रेता असो किंवा गणेशोत्सवातील महाप्रसाद व भंडारा असो, अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला.
सणासुदीच्या काळात भेसळयुक्त मिठाई, अस्वच्छ खाद्यपदार्थ तसेच नियमबाह्य अन्नविक्रीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. प्रत्येक सणाच्या आधी, सणादरम्यान आणि सणानंतर अन्नसुरक्षा नियामकांनी कोणती पावले उचलावीत, याबाबतची नियमावलीही जारी करण्यात येणार असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले.
गणेशोत्सव तसेच नवरात्रोत्सवात विविध मंडळांकडून मोठ्या प्रमाणावर महाप्रसाद आणि भंडार्यांचे आयोजन केले जाते. यावेळी अन्न तयार करणार्या व्यक्तींनाही अन्नसुरक्षेचे नियम लागू राहणार आहेत. खाद्यपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षितता याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. त्यामुळे खाद्य व्यावसायिक, आयोजकांनी नियमांचे पालन करुनच अन्न वितरण करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.