नेपाळमध्ये रायगडचे ३७ नागरिक सुरक्षित , जिल्हाधिकारी किशन जावळे यांची माहिती

By Raigad Times    28-Aug-2026
Total Views |
nepal
 
अलिबाग | नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुराच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील ३७ नागरिक सुरक्षित असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे. नेपाळमधील पूरस्थितीमुळे अनेक भागांतील संपर्क आणि वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असताना रायगडमधील नागरिक सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
 
नेपाळच्या रासुवा जिल्ह्यात बुधवारी (२६ ऑगस्ट) आलेल्या भीषण ‘फ्लॅश फ्लड’ने मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. भोटे कोशी नदीच्या परिसरात आलेल्या अचानक पुरामुळे घरे, वाहने, पूल आणि रस्त्यांचे मोठे नुकसान झाले असून अनेक नागरिक आणि पर्यटक संपर्काबाहेर गेले आहेत. या आपत्तीचा फटका नेपाळ मार्गे कैलास मानसरोवर यात्रेला जाणार्‍या भारतीय नागरिकांनाही बसला आहे.
 
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार नेपाळमध्ये शेकडो भारतीय नागरिकांशी संपर्क होऊ शकलेला नाही, तर काही भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. बचाव आणि मदतकार्य सुरू असून संपर्क व्यवस्था पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील नेपाळमध्ये असलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेण्यात आली.
 
त्यामध्ये रायगडचे ३७ नागरिक सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले, अशी माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली. नेपाळमधील परिस्थिती अद्याप गंभीर असून बचाव पथकांकडून शोधमोहीम आणि मदतकार्य सुरू आहे. त्यामुळे रायगडमधील नेपाळमध्ये असलेल्या नागरिकांच्या संपर्काबाबत प्रशासनाकडून आवश्यक ती माहिती घेतली जात असून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.