आंबेवाडीच्या आठवडा बाजारात घाणीचे साम्राज्य, दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात; स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी

By Raigad Times    27-Aug-2026
Total Views |
kolad news
 
कोलाड | रोहा तालुक्यातील आंबेवाडी (कोलाड) येथील आठवडा बाजार परिसरात बेशिस्तपणे कचरा टाकण्यात येत असल्याने मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली आहे. कालव्यालगत साचलेल्या कचर्‍यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून बाजारात खरेदीसाठी येणार्‍या नागरिकांना नाक मुठीत धरून वावरावे लागत आहे.
 
या अस्वच्छतेची तातडीने दखल घेऊन स्वच्छता मोहीम राबवावी आणि साचलेल्या कचर्‍याची योग्य विल्हेवाट लावावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील आंबेवाडी नाका हे परिसरातील महत्त्वाचे मध्यवर्ती ठिकाण असून येथे वर्षभर दर रविवारी आठवडा बाजार भरतो. या बाजारात भाजीपाला, कांदे-बटाटे, मासळी, सुकी मासळी, कपडे, चप्पल तसेच विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी परिसरातील सुमारे ७० ते ७२ वाड्या-वस्त्या व खेड्यांमधून नागरिक येतात.
 
मात्र बाजारालगतच्या कालव्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने या परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. विशेषतः भाजीपाला आणि मासळी विक्रीच्या परिसरात कचर्‍याचे प्रमाण अधिक असल्याने ग्राहक तसेच विक्रेत्यांना त्रास सहन करावा लागत आहे. अस्वच्छ वातावरणाचा बाजारातील व्यवसायावरही प्रतिकूल परिणाम होत असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
 
सध्या पावसाळा सुरू असल्याने साचलेल्या कचर्‍यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. कचरा, पाणी आणि चिखल यामुळे परिसरात दुर्गंधी वाढत असून रोगराई पसरण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. डासांची उत्पत्ती वाढून डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो, अशीही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कालव्याच्या परिसरात एम.पी.एस.एस. इंग्लिश मीडियम स्कूल असल्याने या मार्गावरून विद्यार्थ्यांसह मोठ्या संख्येने नागरिकांची ये-जा असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना या अस्वच्छतेचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
 
आंबेवाडी ग्रामपंचायत प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन बाजार परिसराची स्वच्छता करावी, कालव्यालगत साचलेला कचरा हटवावा आणि भविष्यात कचरा टाकला जाणार नाही यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. आठवडा बाजारातील स्वच्छता आणि आरोग्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.