रायगडात आ.महेंद्र दळवी,तटकरे वाद विकोपाला;आ.अनिकेत तटकरेंचा आ.दळवींवर पलटवार

पत्नीला अध्यक्षपद मिळवण्यासाठी तटकरेंकडे फेर्‍या मारल्याचा दावा

By Raigad Times    27-Aug-2026
Total Views |
mangoan news
 
माणगाव | रायगड जिल्ह्यात महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्या राष्ट्रवादीविरोधातील वक्तव्याला राष्ट्रवादीचे आमदार अनिकेत तटकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
 
‘पत्नीला जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळावे यासाठी ते तटकरेंकडे फेर्‍या मारत होते,’ असा दावा करत त्यांनी दळवींवर थेट निशाणा साधला. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी खासदार सुनील तटकरे आणि त्यांच्या राजकीय भूमिकेवर सातत्याने टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी दळवींनी ‘राष्ट्रवादी हा खोडा घालणारा पक्ष आहे. त्यांना आम्ही गणतीत पकडत नाही,’ अशी टीका केली होती.
 
दळवी यांच्या या वक्तव्याला सुनील तटकरे यांचे पूत्र आणि राष्ट्रवादीचे आमदार अनिकेत तटकरे यांनी प्रत्युत्तर दिले. ‘दळवी यांच्या अकलेची आणि आकलनशक्तीची कीव येते,’ अशा तिखट शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्याचवेळी जिल्हा परिषद निवडणुकीनंतर दळवी यांनी पत्नी मानसी दळवी यांना अध्यक्षपद मिळवून देण्यासाठी तटकरे यांची मदत मागितल्याचा दावा त्यांनी केला.
 
अनिकेत तटकरे यांनी दळवी यांच्या पूर्वीच्या राजकीय भूमिकेचा संदर्भ देत ‘जिल्हा परिषद निवडणुकीनंतर पत्नी मानसी दळवी यांना अध्यक्षपद मिळावे यासाठी ते तटकरे साहेबांकडे फेर्‍या मारत होते. त्यांनी किती फेर्‍या मारल्या आणि काय काय केले, हे आम्हाला माहिती आहे,’ असा दावा केला. एका बाजूला महायुतीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादीसोबत सत्तेत असताना दुसर्‍या बाजूला राष्ट्रवादीवरच टीका केली जात असल्याने तटकरे- दळवी संघर्षाला आता वैयक्तिक राजकीय आरोपप्रत्यारोपांची धार आली आहे.
 
विशेषतः जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या राजकारणाचा संदर्भ देत तटकरेंनी केलेल्या वक्तव्यामुळे रायगडच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. रायगडमध्ये महायुतीतील घटक पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर अनेकदा राजकीय मतभेद समोर आले आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही शिवसेना आणि राष्ट्रवादीतील संघर्ष उघड झाला होता. त्यानंतर आता दळवी आणि तटकरे यांच्यातील शाब्दिक संघर्षामुळे महायुतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा ऐरणीवर आली आहे. आगामी काळात महायुतीतील या दोन घटक पक्षांचे स्थानिक राजकीय संबंध कसे राहतात आणि या आरोप-प्रत्यारोपांची पुढील दिशा काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.