श्रीवर्धन, सर्वेतील समुद्रकिनारच्या जमिनींचा ‘बाजार’ तेजीत

शासकीय जागांवरील अतिक्रमण, अवैध बांधकामे व अनधिकृत असेसमेंटचा मुद्दा ग्रामसभेत गाजला

By Raigad Times    27-Aug-2026
Total Views |
 shreewardhan
 
दिघी | श्रीवर्धन तालुक्यातील सर्वे येथील समुद्रकिनारी असलेल्या शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे, अवैध बांधकामे आणि अनधिकृत असेसमेंटचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. बुधवारी (२६ ऑगस्ट) झालेल्या ग्रामसभेत असेसमेंट उतारे देताना आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
 
या प्रकरणी तहसीलदारांनी चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणाची ४ जून रोजी तहसीलदारांनी दिलेल्या पत्राद्वारे प्रत्यक्ष स्थळपाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर ५ जूनच्या पत्रात स्थानिकांच्या नावावर ग्रामपंचायतीमार्फत असेसमेंट करून संबंधित जागा बाहेरील व्यक्तींना विकल्या जात असल्याच्या तक्रारीची दखल घेण्यात आली.
 
अनधिकृत असेसमेंटची चौकशी करून ते रद्द करण्याची कार्यवाही करावी, प्लॉट विक्रीस प्रतिबंध करावा आणि दोषींवर कारवाई करावी, अशा सूचना या पत्रातून देण्यात आल्या. ६ जूनच्या पत्रातही शासकीय जागेचे असेसमेंट करून त्यानंतर त्यांचा व्यवहार अथवा विक्री होत असल्याच्या तक्रारीचा संदर्भ देण्यात आला आहे. त्यानंतर १० जून रोजी मंडल अधिकार्‍यांनी सादर केलेल्या अहवालात ९५ घरांचे असेसमेंट झाल्याचे, तसेच काही मालमत्ता तालुक्याबाहेरील व्यक्तींशी संबंधित असल्याचे नमूद केले आहे.
 
अन्य नोंदींमध्ये १५ व्यक्तींची नावे अतिक्रमणधारक म्हणून नमूद असल्याचेही समोर आले आहे. याच प्रकरणात १९ जून २०२६ रोजी गटविकास अधिकार्‍यांना देण्यात आलेल्या पत्रात सर्वे गावातील समुद्रकिनारी असलेल्या शासकीय जागा परप्रांतीयांना विकण्याचा धंदा सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शासकीय जागांची परस्पर विक्री करून त्यावर अवैध बांधकामे करण्यात आली असून, या बांधकामांचे असेसमेंट उतारे ग्रामपंचायतीमार्फत देण्यात आल्याचा दावा पत्रात करण्यात आला आहे.
 
संबंधित बांधकामांची प्रत्यक्ष पाहणी करून ती तातडीने थांबवावीत आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मोतीराम बाळाराम परबळकर यांनी ग्रामपंचायतीला दिलेल्या पत्रातून या प्रकरणातील स्थळपाहणीची फेरतपासणी करण्याची मागणी केली आहे. संबंधित अधिकारी, मंडल अधिकारी, तलाठी तसेच ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांकडून माहिती घेण्याची मागणी करत त्यांनी ४५ दिवसांत कार्यवाही न झाल्यास तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
तहसीलदारांच्या पत्रावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. लवकरच सर्वे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि सरपंच यांना पत्र देऊन अहवाल मागविण्यात येईल. त्यानंतर आवश्यक ती कारवाई केली जाईल. - राजू किरवे, गटविकास अधिकारी, श्रीवर्धन