वीर रेल्वे स्थानकावर सर्व एक्स्प्रेसना थांबा द्या; अन्यथा ७ सप्टेंबरला रेल रोको

५ सप्टेंबरचा अल्टिमेटम; ‘मिशन वीर रेल्वे थांबा’ कृती समिती आक्रमक

By Raigad Times    27-Aug-2026
Total Views |
mahad
 
महाड | वीर रेल्वे स्थानकावर सर्व एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्यासह महाड- पोलादपूर परिसरातील रेल्वे प्रवाशांच्या विविध मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अन्यथा ७ सप्टेंबर २०२६ रोजी वीर रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ‘मिशन वीर रेल्वे थांबा महाड-पोलादपूर कृती समिती’चे मुख्य प्रवर्तक तथा पत्रकार मनोज खांबे यांनी दिला.
 
मागण्या मान्य करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाला ५ सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. महाड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत खांबे यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. महाडचे ऐतिहासिक, पर्यटन व औद्योगिक महत्त्व लक्षात घेता वीर स्थानकावर अधिकाधिक एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळणे आवश्यक असल्याचे समितीने स्पष्ट केले.
 
महाड-पोलादपूर परिसरातील नागरिक मुंबई, ठाणे, कल्याण तसेच गुजरातमधील अहमदाबाद, बडोदा आणि सुरत येथे मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. वीर स्थानकावर प्रमुख गाड्यांना थांबा मिळाल्यास या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे खांबे यांनी सांगितले. यासाठी रेल्वेमंत्री, केंद्रीय राज्यमंत्री, खासदार, रायगडचे पालकमंत्री तसेच कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
 
वीर रेल्वे स्थानकाचा नामविस्तार करून ‘वीर रेल्वे-महाड’ असे नामकरण करावे, अशी मागणीही समितीने केली आहे. त्याचबरोबर महाड एमआयडीसी ते पोलादपूर परिसराला जोडणारा नवीन रेल्वे फाटा, वीर स्थानकावर सर्व एक्स्प्रेसच्या तिकीट बुकिंगची सुविधा आणि वीरपनवेल मेमू सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. महाड पोस्ट कार्यालयातील बंद रेल्वे आरक्षण सुविधाही पुन्हा सुरू करण्याची मागणी आहे.
 
कोकण रेल्वे मार्गावरून दररोज सुमारे २७ गाड्या धावत असतानाही वीर स्थानकावर मोजक्याच गाड्यांना थांबा मिळतो. त्यामुळे या परिसरातील प्रवाशांना रेल्वे सुविधेपासून वंचित राहावे लागत असल्याचे समितीचे म्हणणे आहे. ५ सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास ७ सप्टेंबरला रेल रोको करण्यात येईल आणि मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार समितीने व्यक्त केला आहे.