अलिबाग | शिवसेना (ठाकरे गटाचे) युवा नेते आदित्य ठाकरे यांनी बुधवारी (२६ ऑगस्ट) मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. महामार्गाच्या रखडलेल्या कामावरुन त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. महामार्गावरील एका पुलाशेजारी लागलेल्या होर्डींगवरुन त्यांनी, पूल ‘स्पेस टेक्नॉलॉजी’चा आणि पालकमंत्र्यांचा बॅनर ए-वन क्वालिटीचा...असा टोला त्यांनी गोगावले यांना लगावला.राज्य सरकारसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केली.
महामार्गाची पाहणी करताना त्यांनी रस्त्यावरील खड्डे, बंद करण्यात आलेला पूल आणि पाण्याने भरलेले बोगदे व अंडरपास दाखवत सरकारच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दहा वर्षांपासून गणपतीपूर्वी महामार्ग पूर्ण होणार, अशी आश्वासने दिली जात आहेत; मात्र प्रत्यक्षात परिस्थिती बदललेली नाही, असा आरोप त्यांनी केला. मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करताना एका पुलाकडे लक्ष वेधत आदित्य ठाकरे म्हणाले की, हा पूल ‘स्पेस टेक्नॉलॉजी’ने बांधण्यात आल्याचे सांगितले गेले; मात्र बांधकामानंतर काही दिवसांतच तो बंद करण्याची वेळ आली.
नॅशनल हायवेच्या अधिकार्यांनी ऑडिट केल्यानंतर हा पूल बंद करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. महामार्गाच्या काही भागांत खड्डे असून, बोगद्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी रस्ता पूर्ण होईल, असे सांगितले जाते. मंत्री आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पाहणी दौरे करतात; मात्र महामार्गाचे काम पूर्ण होत नसल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
कंत्राटदार वर्षानुवर्षे काम सोडून पळून जात असतील तर संबंधित खात्याच्या आणि मंत्रिपदाच्या कार्यक्षमतेचा काय उपयोग?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पाण्याने भरलेल्या बोगद्याकडे लक्ष वेधताना ठाकरे यांनी येथे अक्षरशः मासे पाहायला मिळत असल्याची उपरोधिक टिप्पणी केली. काही अंडरपासमध्ये ग्रामस्थ आणि लहान मुलांना एका बाजूवरुन दुसर्या बाजूला जाण्यासाठी वापर करावा लागतो; मात्र पावसाळ्यात त्यात गुडघाभर पाणी साचत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरुन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरही आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला. ‘दुबईच्या राजाने मंत्री महोदयांना दुबईचे रस्ते बनवायला बोलावले असल्याचे ऐकले,’ अशी उपरोधिक टिप्पणी करत त्यांनी महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केला. हा महामार्ग तयार करताना अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरल्याचे सांगितले जाते; मात्र प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी असल्याचा दावा त्यांनी केला रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांच्या नावाचे महामार्गालगत लावण्यात आलेले बॅनर दाखवत आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यावरही टोला लगावला.
‘पालकमंत्र्यांचे बॅनर १ क्वॉलिटीचे आहेत; मग पुलांची आणि रस्त्यांची क्वॉलिटी कधी १ होणार?’, असा सवाल त्यांनी केला. महामार्गाची अवस्था गंभीर असताना मंत्र्यांच्या दौर्यांचा काय उपयोग, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी गेल्या काळात पालकमंत्रीपदावरून सुरू असलेल्या राजकीय संघर्षावरही भाष्य केले. ‘मंत्र्यांमध्ये भांडण झाले; मात्र रस्त्याच्या प्रश्नावर कोणी आवाज उठवला नाही.
कारण हे मंत्र्यांचे भांडण नसून कंत्राटदारांचे भांडण आहे,’ असा आरोप त्यांनी केला. महामार्गाच्या प्रश्नाबरोबरच आदित्य ठाकरे यांनी परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावरुनही सरकारवर हल्लाबोल केला. नीट परीक्षेतील पेपरफुटी, सीईटी आणि एमपीएससीच्या परीक्षांतील कथित गैरप्रकारांचा संदर्भ देत त्यांनी सरकारच्या कारभारावर टीका केली. ‘एक परीक्षा नीट घेता येत नाही आणि वन नेशन, वन इलेक्शन करायचे आहे,’ असा सवाल त्यांनी केला.