कर्जत | खरीप हंगामातील पिकांना खताची गरज असतानाच कर्जत तालुक्यात युरिया खताच्या उपलब्धतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, तालुक्यात आतापर्यंत १,१३२.५६ मेट्रिक टन युरियाची आवक झाली असून त्यापैकी १,०८२.२६ मेट्रिक टन युरियाची विक्री झाल्याची नोंद आहे. त्यामुळे सध्या केवळ ५०.३० मेट्रिक टन साठा शिल्लक आहे.
दुसरीकडे युरियाची मागणी तब्बल ४०० मेट्रिक टन असल्याने उपलब्ध साठा अपुरा ठरत आहे. कर्जत तालुका कृषी अधिकारी राजेंद्र शिंदे यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार, युरियासह एनपीकेएस आणि एसएसपी या खतांची मिळून १,४१३.५६ मेट्रिक टन आवक झाली आहे.
त्यापैकी १,३२०.५४ मेट्रिक टन खताची विक्री झाल्याची नोंद असून ९३.०२ मेट्रिक टन साठा शिल्लक आहे. यामध्ये एनपीकेएसचा ३०.६२ आणि एसएसपीचा १२.१० मेट्रिक टन साठा आहे. या तिन्ही खतांची एकूण मागणी ४८० मेट्रिक टन असल्याचे कृषी विभागाच्या अहवालातून स्पष्ट होते.
एप्रिल ते ऑगस्टदरम्यान १,१३२.५६ मे. टन युरियाची आवक
कृषी विभागाच्या नोंदीनुसार, २० एप्रिल ते १६ ऑगस्ट २०२६ या कालावधीत कर्जत तालुक्यातील विविध कृषी विक्रेते व संस्थांमार्फत युरियाच्या अनेक खेपा दाखल झाल्या. सुहास अॅग्रो ट्रेडर्स, कर्जत तालुका एसकेव्हीएस, युगंधरा कृषी सेवा केंद्र, मोक्षदा अॅग्रो सेंटर, प्रचित अॅग्रो डेव्हलपर, समर्थ कृषी सेवा केंद्र यांच्यासह विविध विक्रेत्यांकडे युरियाचा पुरवठा झाल्याची नोंद आहे.
२० एप्रिल रोजी सुहास अॅग्रो ट्रेडर्समार्फत २५.०२ मे. टन युरियाच्या पुरवठ्याने सुरू झालेली आवक १६ ऑगस्टपर्यंत सुरू होती. १६ ऑगस्ट रोजी प्रचित अॅग्रो डेव्हलपरमार्फत २५.०२ मे. टन युरियाची आवक झाल्याची शेवटची नोंद आहे. या सर्व खेपांची एकत्रित आकडेवारी १,१३२.५६ मे. टन इतकी आहे.
आवक-विक्री मोठी; तरी खत मिळत नसल्याची तक्रार
शासकीय नोंदींमध्ये मोठ्या प्रमाणात युरियाची आवक आणि विक्री झाल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्षात अधिकृत कृषी विक्रेत्यांकडे खतासाठी जाणार्या शेतकर्यांना ‘युरिया उपलब्ध नाही’ असे सांगितले जात असल्याच्या तक्रारी आहेत. कर्जत शहरासह कशेळे, कडाव, नेरळ आणि तालुक्यातील इतर बाजारपेठांमध्ये शेतकरी युरियासाठी हेलपाटे मारत आहेत.
अनुदानित दरातील युरियाची मागणी मोठी असताना शासकीय आकडेवारीतील विक्री आणि प्रत्यक्ष शेतकर्यांना उपलब्ध होणारे खत यामध्ये तफावत का दिसत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. युरियाचा शेतीबाहेरील वापर आणि अनुदानित व बाजारभावातील तफावत लक्षात घेता वितरण व्यवस्थेवर अधिक काटेकोर नियंत्रणाची गरज व्यक्त होत आहे. सध्या ४०० मे. टन युरियाची मागणी असताना केवळ ५०.३० मे. टन साठा उपलब्ध आहे.
खरीप पिकांना खत देण्याचा महत्त्वाचा कालावधी सुरू असल्याने वेळेत पुरवठा न झाल्यास पिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकर्यांकडून व्यक्त होत आहे. "तालुक्यात युरियाची कमतरता असताना अनुदानित दरातील एक बॅग मिळविण्यासाठी शेतकर्यांना कर्जत, कशेळे, कडाव, नेरळ आदी बाजारपेठांमध्ये वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे वेळ आणि प्रवासाचा खर्च वाढत असून अनेकदा खताची बॅग मिळतही नाही. या प्रकरणी शेतकर्यांशी संपर्क साधून वस्तुस्थिती जाणून घेऊन संबंधित विभागाकडे चौकशीची मागणी करण्यात येईल,” अशी प्रतिक्रिया प्रगतिशील शेतकरी तथा शेतकरी सल्ला समिती, कर्जतचे उपाध्यक्ष अंकुश शेळके यांनी दिली.