पनवेल | गणेशोत्सवाला अवघे तीन आठवडे शिल्लक असताना पनवेल शहरात उत्सवाची लगबग सुरू झाली आहे. विविध गणेश मंडळांकडून सजावट, विद्युत रोषणाई, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच आगमन आणि विसर्जन मिरवणुकीच्या नियोजनाला वेग आला आहे.
त्याचबरोबर ढोल-ताशा पथकांच्या तालमींनाही जोर आला असून, शहरातील विविध भागांत ढोल-ताशांचा निनाद ऐकू येऊ लागला आहे.पनवेलमधील विविध परिसरांत तरुण-तरुणींचे गट दररोज ढोल, ताशा आणि झांजांच्या तालावर सराव करताना दिसत आहेत. मोकळी मैदाने, उड्डाणपुलांखालील जागा तसेच उपलब्ध सार्वजनिक जागांमध्ये पथकांच्या नियमित तालमी सुरू आहेत.
गणेशोत्सवातील आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत प्रभावी सादरीकरण करण्यासाठी पथकांकडून विशेष मेहनत घेतली जात आहे. यंदा काही गणेश मंडळांनी ढोल-ताशा पथकांसाठी नवीन वाद्यसामग्रीही घेतली आहे. पारंपरिक ढोल-ताशांच्या तालासोबत विविध तालांचा मेळ साधण्याचा प्रयत्न केला जात असून, वादनातील ताल, लय, वेग आणि एकसंघता यावर विशेष भर दिला जात आहे.
नियमित सरावामुळे पथकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिरवणुकीच्या नियोजनाला वेग गणेश मंडळांकडून आगमन आणि विसर्जन मिरवणुकीचे मार्ग, वाहनांची सजावट, विद्युत रोषणाई आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन सुरू झाले आहे. मिरवणुकीत ढोल-ताशा पथकांचे सादरीकरण आकर्षणाचे केंद्र ठरणार असल्याने त्यासाठी सरावाला अधिक वेळ दिला जात आहे. गणेशोत्सवाला अद्याप तीन आठवडे बाकी असले तरी पनवेल शहरातील वातावरणात उत्सवाची रंगत जाणवू लागली आहे. ढोल-ताशांच्या तालमींमुळे शहरातील विविध भागांत गणेशोत्सवाची चाहूल लागली असून, आगामी उत्सवासाठी तरुणाई उत्साहाने तयारीला लागल्याचे चित्र आहे.