उरण | उरण शहरासह द्रोणागिरी परिसरात रस्त्यावर मोकाट फिरणार्या जनावरांचा प्रश्न गंभीर बनला असून, मोकाट बैलाने स्कूटीला दिलेल्या धडकेत ५५ वर्षीय हॉटेल व्यावसायिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी (२४ ऑगस्ट) रात्रीच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, द्रोणागिरी, उरण येथील प्रजापती प्राईड इमारतीत राहणारे महेंद्र झामनदास सहतिया (वय ५५) हे पत्नी रेणु महेंद्र सहतिया (वय ५५) यांच्यासोबत स्कुटीवरुन जात होते. त्यावेळी अचानक रस्त्यावर आलेल्या बैलाची त्यांच्या स्कुटीला जोरदार धडक झाली.
धडक इतकी भीषण होती की, दोघेही स्कुटीवरुन कोसळून गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी महेंद्र सहतिया आणि रेणू सहतिया यांना उपचारासाठी उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी रात्री साडेनऊच्या सुमारास महेंद्र सहतिया यांना मृत घोषित केले.
त्यांच्या पत्नी रेणु सहतिया यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मयताच्या पत्नी रेणू सहतिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, उरण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रस्त्यावर मोकाट फिरणार्या जनावरांमुळे हा दुर्दैवी अपघात घडल्याने द्रोणागिरी आणि उरण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.