स्मार्ट मीटरचा शॉक! सहा बाय आठच्या टपरीला ५ हजारांचे बिल!

श्रीवर्धन कोलमांडले गावातील मारुती पड्याळ चक्रावले; महावितरणकडे तक्रार

By Raigad Times    26-Aug-2026
Total Views |
shreewardhan
 
श्रीवर्धन | स्मार्ट मीटरच्या अचूकतेबाबत राज्यभर चर्चा सुरु असतानाच श्रीवर्धन तालुक्यातील कोलमांडले गावात एका छोट्या व्यावसायिक टपरीला तब्बल ५ हजार रुपयांचे वीजबिल आल्याचा प्रकार समोर आला आहे.
 
अवघ्या सहा बाय आठ फुटांच्या वडापाव, पॅटिस व पकोडे विक्रीच्या टपरीत अत्यल्प वीज वापर असतानाही जून महिन्यात तब्बल ३४४ युनिट वापर दाखवून ५,०५० चे बिल आकारण्यात आल्याने टपरीधारक मारुती गोविंद पड्याळ यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. पड्याळ यांच्या टपरीमध्ये दोन एलईडी बल्ब असून ते सायंकाळी सहा ते रात्री साडेनऊपर्यंतच सुरू असतात. याशिवाय एक छोटा घरगुती फ्रीज वापरात आहे.
 
आईस्क्रीम ठेवण्यासाठीचा दुसरा फ्रीज पावसाळ्यातील थंड वातावरणामुळे जूनपासून बंद असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रत्यक्ष वीज वापराच्या तुलनेत बिलामध्ये दाखविण्यात आलेली युनिटची संख्या अधिक असल्याचा दावा त्यांनी केला आहे. टपरीधारकांच्या म्हणण्यानुसार, मे महिन्याचे बिल जूनमध्ये सुमारे १,५०० रुपये आले होते. त्यानंतर पुढील महिन्यात अचानक ३४४ युनिट वीज वापर दाखवत ५,०५० रुपयांचे बिल आल्याने त्यांनी महावितरणकडे धाव घेतली.
 
"टपरीमध्ये दोन बल्ब आणि एक छोटा फ्रीज सुरू असताना ३४४ युनिट वीज वापर कसा झाला, हे समजत नाही. एवढे बिल भरणे आमच्यासारख्या छोट्या व्यावसायिकासाठी मोठे आर्थिक ओझे आहे. त्यामुळे मीटरची तपासणी करून बिलाची पुनर्तपासणी करावी,” अशी मागणी मारुती गोविंद पड्याळ यांनी केली. या प्रकरणी पड्याळ यांनी महावितरणकडे लेखी अर्ज करून मीटरची तांत्रिक तपासणी, मीटर रीडिंगची पडताळणी आणि वाढीव बिलाची पुनर्तपासणी करण्याची मागणी केली आहे.
 
मात्र अर्ज केल्यानंतरही बिल भरावेच लागेल, असे सांगण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे. दरम्यान, स्मार्ट मीटर बसवल्यानंतर ग्रामीण भागातील काही ग्राहकांकडून वाढीव वीजबिलांबाबत तक्रारी होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कोलमांडले येथील या प्रकरणाची महावितरणने तांत्रिकदृष्ट्या सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी आणि बिलामध्ये त्रुटी असल्यास ग्राहकाला दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.अत्यल्प वीज वापर असलेल्या छोट्या व्यावसायिकाला एवढे मोठे बिल कसे आले, याबाबत आता महावितरणच्या तपासणी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.