करंजाडेत बनावट कॉल सेंटरचा भांडाफोड , कर्जाच्या आमिषाने ऑनलाईन फसवणूक करणार्‍या टोळीतील चौघे जेरबंद

By Raigad Times    26-Aug-2026
Total Views |
kamboli
 
कळंबोली | कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवत प्रोसेसिंग फी, इन्शुरन्स, होल्डिंग चार्ज आणि जीएसटी चार्जच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करणार्‍या आंतरराज्यीय टोळीचा पनवेल शहर पोलिसांनी भांडाफोड केला आहे.
 
करंजाडे परिसरातील भाड्याच्या फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर छापा टाकून पोलिसांनी चार जणांना रंगेहाथ अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे ३ लाख ९५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत करंजाडे परिसरात काही व्यक्ती भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहून लॅपटॉप, मोबाईल फोन आणि इंटरनेटच्या माध्यमातून कॉल सेंटर चालवत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.
 
हे आरोपी स्वतःची ओळख लपवून नागरिकांशी संपर्क साधत तसेच नामांकित फायनान्स कंपनीतून बोलत असल्याचे भासवत होते. कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांकडून आधी प्रोसेसिंग फी, त्यानंतर इन्शुरन्स, होल्डिंग चार्ज, जीएसटी चार्ज आदी विविध कारणे सांगून पैसे उकळले जात होते. ऑनलाइन स्कॅनरच्या माध्यमातून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये रक्कम जमा करून नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचे पोलिस तपासात समोर आले.
 
या माहितीची गंभीर दखल घेत पनवेल शहर पोलीस ठाणे, सायबर पोलीस ठाणे नवी मुंबई आणि कळंबोली पोलीस ठाणे यांचे संयुक्त पथक तयार करण्यात आले. २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता निलगिरी अपार्टमेंट, रूम क्रमांक ४०१, सेक्टर आर-४, प्लॉट क्रमांक २४, करंजाडे येथे पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत विजय बाबू भंडारी (३६), तुषार अरुण पिंगळे (३४), रोहित रंगाप्पा गौडा (२१) आणि दर्शन उमाशंकर (२१) या चौघांना अटक करण्यात आली.
 
आरोपींकडून फसवणुकीसाठी वापरण्यात येणारे ३ लॅपटॉप, १५ मोबाईल फोन, विविध व्यक्तींच्या नावावरील ७ बँकांचे डेबिट कार्ड, ३१ सिमकार्ड, ७४ हजार ४०० रुपये रोख, हिशोबाच्या २ वह्या, १ डायरी, वायफाय राऊटर आणि नेटवर्क टर्मिनल डिव्हाईस असा एकूण ३ लाख ९५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस उपआयुक्त रश्मी नांदेडकर, परिमंडळ-३ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त मथुर भुजबळ, पनवेल विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार, पोलीस निरीक्षक शाकीर पटेल (गुन्हे), पोलीस निरीक्षक अभिजीत अभंग (प्रशासन) तसेच पनवेल शहर, सायबर आणि कळंबोली पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
 
नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
ऑनलाईन कर्ज देण्याच्या नावाखाली अनोळखी व्यक्तींना पैसे पाठवू नयेत. कोणतीही फायनान्स कंपनी कर्ज मंजुरीपूर्वी विविध शुल्कांच्या नावाखाली संशयास्पद पद्धतीने पैसे मागत असल्यास नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.